प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 26 March 2026

तुझ्यासाठीच


तुझ्यासाठीच गुंफला हा भावविश्वाचा पसारा,
तुझ्यासाठीच फुलवला हा प्रेमाचा मोर पिसारा।

तुझ्या एका स्मितहास्यात विश्व सगळं उजळून गेलं,
मी मात्र सावल्यांमध्ये शोधत राहिलो निवारा।

तुझ्या स्वप्नवेलींनी बांधला मी श्वास माझा,
तुझ्या भेटीचा स्वप्नातही केला प्रत्येक क्षण साजरा।

तुझ्या आठवणींचा वारा अजूनही स्पर्शून जातो,
तो स्पर्श वाटतो जणू एखादा थंड निखारा।

‘मेघ’ अजूनही भिजतो त्या आठवांच्या क्षणांत चिंब,
अलवार पसरतो देहांत एक अनामिक शहारा।

गुरुवार, २६/३/२६ , ८:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ


Wednesday, 25 March 2026

काय राखतो?




मतला:

विचारलंस आम्हाला—आम्ही आणखी काय राखतो,
ओठांवर शब्द आणि हातात लेखणी राखतो।

रक़ीबाचे दर्शन जेव्हा होते नकळत असे,
स्पंदनांच्या अंतरी मुक दुःखही राखतो।

तुझं प्रेमच कदाचित—माझा एखादा भ्रम असेल,
तरीही तुझा प्रत्येक घाव शिरोधार्य राखतो।

तुझ्या त्या आडमुठेपणाचा थांबत नाही सिलसिला,
जगण्यासाठी म्हणून थोडासा स्वतःचाच भ्रम राखतो।

हे प्रेमच वेडं आहे—मनास कधी न जुमाने,
तुझे प्रतिबिंब नेहमी डोळ्यांतच राखतो।

मकता:

‘मेघ’ म्हणे—इतकं सोपं नाही मनाला ओळखणं,
या हृदयात दडवून अगणित गूढविश्वं राखतो।

बुधवार, २५/३/२६ , ७:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ

क्या रखते हैं?



(मतला)

गर हमसे पूछो के हम और क्या रखते हैं,
ओठों पे सुख़न और हाथ में कलम रखते हैं।

दिदार-ए-रक़ीब जब भी होते हैं,
धड़कनों के साथ दिल में ग़म रखते हैं।

हो सकता है तेरी चाहत—इसे मेरा एक भरम समझे,
हम सर-आँखों पर तेरा हर सितम रखते हैं।

तेरी वहशत का सिलसिला थमता ही नहीं, सितमगर,
जीने के लिए फिर थोड़ा सा वहम रखते हैं।

ये इश्क़ भी अजीब है, हिसाब नहीं मानता,
हम तेरे नाम पर हर रोज़ नया करम रखते हैं।

(मकता)
‘मेघ’—इतना भी आसान नहीं दिल को समझाना,
इन धड़कनों में छुपाकर कई आलम रखते हैं।

बुधवार, २५/३/२६ , ७:३० PM
अजय सरदेसाई -मेघ


Tuesday, 24 March 2026

आतून उमटतात स्वर यमनाचे


वीण आपली तुटत नाही मज तुझी आठवण येते,
त्या गडद जलद निळ्या वर्षेतून मज तुझी हाक येते।

कधी सगुण कधी निर्गुण रूप दिसते हृदयाते,
जिव वेडा पिसा होतो तुझ्या दर्शनाते।

इंद्रिये माझी अवघी गुणगुणती गीत कुणाचे,
आतून उमटतात माझ्या का स्वर यमनाचे।

धूसरल्या या वाटांवरी मी तुझाच शोध घेतो,
कळ्यांच्या मर्मबंधातून तूच उमलून येतो।

कधी शांत ध्यानातून तू रिसतोस अंतरात,
मीच हरवून जातो मग त्या निळ्या अनंतात।

मंगळवार, २४/३/२६ , ३:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ 

Sunday, 22 March 2026

माझी कविता


 

श्वासाश्वासात एक कविता जगते माझ्या,
हृदयात ती कविता स्पंदते माझ्या…१

साधेच रूप तिचे, ती नव्हे लावण्यवती,
नीटनेटकी उतरते तरी ती शब्दांत माझ्या…२

नाही रंग तिला, ना आकार स्वतःचा,
भावनांचा अलंकार ती नेसून येते माझ्या…३

मौनातल्या गाभाऱ्यात ती अलवार उमलते,
परा–पश्यंती–मध्यमा, शेवटी वैखरी असा प्रवास करते…४

लेखणीतून ती शब्दांत उतरते तेव्हाच उमगते,
एरव्ही पराच्या सूक्ष्म जगात विहरते…५

निर्माता दिसलो जरी मी, निर्माण नाही करत,
ती स्वयंभू नि स्वयंप्रकाशी—आहे उपजत…६

कवी म्हणून मी फक्त नावास आहे,
कधी, कुठे, का नि कसे व्यक्त व्हावे—यास ती स्वयंसिद्ध आहे…७

शब्दांच्या पलीकडे तिचा खरा वास आहे,
श्वासातल्या शांततेतच तिचा निवास आहे…८

रविवार, २२/३/२६ , १:५४ PM
अजय सरदेसाई -मेघ

Saturday, 21 March 2026

अजून न उमजलेले


काय करावे, का करावे, कुणा सांगावे
शांततेतल्या स्वरांना कसे ऐकून घ्यावे...

मनात उठल्या प्रश्नांच्या लहरी अनामिक,
उत्तरांच्या किनाऱ्याला कसे स्पर्श करावे...

दिवस ओलांडती तसेच, अर्थ न उमजता,
क्षणांच्या या प्रवाहाला काय नाव द्यावे...

शब्द येती ओठांवर, पुन्हा विरून जाती,
भावनांच्या दारांना कसे उघडे ठेवावे...

गर्दीतही एकटेपण हळूच येऊन बसते,
स्वतःलाच मग स्वतःशी अलवार भेटवावे...

शोधता शोधता थकलो, सापडले नाही काहीच,
जरा थांबून या शांततेला कसे जवळ घ्यावे...

शनिवार, २१/३/२६ ,  १०:३०. PM
अजय सरदेसाई -मेघ

ते क्षण


विरघळून वाहणारे ते क्षण,
तुझे नि माझे होते ते क्षण।

ओसंडणाऱ्या गोड आठवांचे ते क्षण,
शोधून आता सापडत नाहीत ते क्षण।

चांदण्यांच्या रात्री, चंद्रकोरीचे ते क्षण,
मेघसरींनी चिंब भिजलेले ते क्षण।

तुझ्या डोळ्यांत माझ्या प्रतिबिंबाचे ते क्षण,
तुझ्या मनात माजलेल्या काहुराचे ते क्षण।

वाटले होते कधीच न संपणारे तेच क्षण,
पण गेलेच निसटून—क्षणभंगुर ते क्षण।

शनिवार, २१/३/२६ , ८:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ 

ऋणानुबंध



 ऋणानुबंध जपून ठेवले मी,
उजेडाचे कवडसे जपून ठेवले मी।

रात्र खूप निबिड, काळोखाची होती,
काजव्यांना ओंजळीत जपून ठेवले मी।

वाटेत चुकलेल्या पावलांच्या खुणा होत्या,
स्वप्नांना हलकेच मशाली करून ठेवले मी।

विझलेल्या स्वप्नांच्या गरम राखेतून,
नव्या पहाटेच्या ठिणग्या पेटवून ठेवल्या मी।

जखमा जरी खोल मनात होत्या,
त्यांनाही फुलांचे आवरण दिले मी।

तू नसतानाही तुझ्या अस्तित्वाला,
श्वासांच्या स्पंदनांत अलवार ठेवले मी।

शनिवार, २१/३/२६ , ०७:१७ PM
अजय सरदेसाई -मेघ 

तो अन ती


 

तो:
तू म्हणशील तर तेही करु!
तू सांग न आधी काय करु?

मी चंद्र नी तारे तोडून आणू?
तू सांग न, तेही करु?

मी तुझ्यावर प्रेम तर करतोच!
तू सांग, आणि काय करु?

तो वारा बिलगून जातो तुला!
द्वेष वाटतो त्याचा, काय करु?

तुझ्या डोळ्यात स्वप्नं पाहिले एक,
तू सांग न, ते साकार करु?

तुझ्यावर माझी प्रीती पुराणी,
तू सांग कशी ती दूर करु?

तू प्रेरणा माझी, मी तुझा प्रेरित,
मी तुझ्यावर कविता करतो, करु?

तू सांग न सखे, मी काय करु?
तू जे म्हणशील ते आपण करु!

ती:
तू म्हणतोस, तर तेही करशील,
मी सांगू का खरंच काय करशील?

चंद्र नी तारे तोडून आणू म्हणतोस,
मी म्हणेन—फक्त माझाच बनुंन राहशील?

तू म्हणतोस, प्रेम करतोस खूप,
मी विचारते—स्वतःलाही तितकंच जपशील?

तो वारा बिलगून जातो मला,
मत्सर नको रे… तू स्वतःला त्यात पाहशील?

माझ्या डोळ्यांत स्वप्न पाहिलंस म्हणतोस,
मी म्हणेन—ते स्वप्न आधी तूही जगशील?

तुझी प्रीती पुराणी म्हणतोस जरी,
मी म्हणेन —ती नव्याने दररोज फुलवशील?

तू म्हणतोस, मीच प्रेरणा तुझी,
मी म्हणेन—तुझ्यातलाच ‘मेघ’ तू शोधशील?

तू विचारतोस, “सखे, मी काय करु?”
मी हसून—“फक्त माझ्या निकट राहशील?”

तू जे म्हणशील ते आपण करू म्हणतोस,
मी म्हणेन—“आपणांत कोणतेच प्रश्न न येऊ देशील?

शुक्रवार, २०/३/२६ , ११:०१ PM
अजय सरदेसाई -मेघ

Monday, 16 March 2026

संघर्ष अस्तित्व का


 


अस्तित्व का मेरे संघर्ष चलता रहा,
सुतपुत्र मुझे सारा जमाना कहता रहा।

कवच कुंडल जन्मजात थे मेरे पास,
जमाना कुत्सित नजरों से मुझे ही देखता रहा।

बाणों में मेरी ऊर्जा थी कई सूर्यो की,
अर्जुन का गुणगान फिर भी चलता रहा।

मांगते वक्त सभी ने मेरी ओर देखा,
धर्मराज! लेकिन युधिष्ठिर को ही जग कहता रहा।

हे कृष्ण, तूने चतुराई से हाथ बांधे मेरे,
रिश्ते का कवच ओढ़कर अर्जुन बढ़ता रहा।

कालचक्र को धसाया कीचड़ में,
मृत्यु का शासन फिर मुझपर चलता रहा।

तू हमेशा सखा अर्जुन का ही बना रहा,
संघर्ष, कर्ण का मृत्यू बाद भी चलता रहा।

सोमवार, १६/३/२६ , ८:३६ PM
अजय सरदेसाई -मेघ

Sunday, 15 March 2026

राधेय


कवच दिलेस मला शरीर सावरायला,
काय करू मी मनाचं — ते ही संवेदनशील आहे।

सुतपुत्र म्हणून हिणवते हे जग मला,
सांगू कसं त्यांना — सुतपुत्र नव्हे,मी सूर्यपुत्र आहे।

तो श्रीकृष्ण द्वारकेचा सांगण्यास मज आला,
“सोड सुयोधनास — तू ज्येष्ठ पांडुपुत्र आहे।”

मारू कसे ते तीर आता जे राखले अर्जुनासाठी?
माझेच हात हे, नि हृदयही माझेच आहे।

सांग मला तू आज — मी खरा कोण आहे?
ठरवले मी मनाशी — मी राधेय आहे।

सोमवार, १६/०३/२०२६ – १०:५५ AM
अजय सरदेसाई ‘मेघ’

तुझ्यावर खूप प्रेम आहे



हो, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,
तू दिलेल्या वेदनांचे मज खूप अप्रूप आहे।

वेचली नेहमीच फुले मी तुझ्यासाठी,
तू दिले जे काटे ते मी अजून जपून आहे।

क्लांत शांत समयी तू असतेस मनात,
तुझे ते कडवट बोल अजून कानावर आहे।

लोक म्हणतील कदाचित मी असा प्रेमवेडा,
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे!

जाऊ कुठे सोडून सावल्या आठवांच्या,
विसरू तरी घर त्यांचे माझ्याच मनात आहे।

सोमवार, १६/३/२०२६ — सकाळी ८:३१
अजय सरदेसाई — मेघ

आहे, का नाही....?




तू स्वप्नांत येतेस माझ्या जशी,
मी तुझ्या स्वप्नांत येतो का?
गूढ स्मित तुझ्या ओठांवर उमटे,
अर्थ त्याचा कधी उमगेल का?

स्वप्नांत एरवी बोलतेस खूप,
प्रत्यक्षी मग इतकी रुष्ट का?
तिरक्या नजरेने पाहतेस मला,
तोही केवळ माझा भास का?

द्वेषच वाटला त्या पावसाचा,
तू स्वच्छंद भिजलीस का?
अगतिक उभा मी दूरून पाहतो,
इतकी त्याच्याशी तुझी सलगी का?

क्षणभर नजर माझ्यावर थांबे,
मग पुन्हा अचानक वळते का?
डोळ्यांत ओळख चमकून जाते,
ती होते पुन्हा अपरिचित का?

वेडी आस जी मनाला लागे,
तीच तुझ्याही मनी असेल का?
एकदाच सोक्षमोक्ष लाव याचा,
देत राहशील हुलकावणीच का?

रविवार, १५/३/२६ , ११:३६ PM
अजय सरदेसाई  -मेघ

 

Saturday, 14 March 2026

तमन्ना भी रख


 

ख़ुदा के हाथ में मत सौंप सारे कामों को,
बदलते वक़्त पर कुछ अपना इख़्तियार भी रख।

बंदिशें बहुत आएँगी ज़िन्दगी में तो क्या,
उन्हें तोड़कर आगे बढ़ने का हौसला भी रख।

सिर्फ़ चेहरों से न तौल लोगों की नियत,
उन्हें पहचानने की अपनी सियासत भी रख।

रास्ते में आएँगे कई पहाड़ लेकिन,
उन्हें चीरकर आगे बढ़ने की ताक़त भी रख।

मंज़िल मिलेगी कभी न कभी, कहीं न कहीं,
मंज़िल तक पहुँचने की दिल में तमन्ना भी रख।

शनिवार, १४/३/२०२६ — ६:२० PM
अजय सरदेसाई ‘मेघ’
(Nida Fazli से प्रेरित)

आसही आहे, ओढही


आसही आहे, ओढही,
तू जरा जवळ ये, येतो मीही।
सामोरं आहे आयुष्याचं दर्पण,
पाहा तू त्यात, पाहतो मीही।

दूर आकाशात एक तारा,
दिसतो तो तुलाही, मलाही।
काय नाव त्याचं आठवत नाही,
विसरलीस तूही, विसरलो मीही।

वाट संपलीच नाही, वय ढळत गेलं,
पायवाटा खूप होत्या, वाढत गेल्या।
मार्गात गंतव्य सापडलंच नव्हतं,
जुस्तजू होती तुलाही, मलाही।

काही पक्षी घरटे बनवत आहेत,
गरज काटक्यांची त्यांनाही, आपल्यास ही।
घरटे ते नश्वर आहे, अक्षर नाही,
जाणतात तेही, जाणतो आपणही।

हृदयाच्या जखमा भरल्या आता,
डाग काही उरले तरीही।
चल त्यांना सोपवू काळावर,
नको दुःख तुलाही, नी मलाही।

शनिवार, १४/३/२६,
 १:२५ PM
अजय सरदेसाई — मेघ
 

Friday, 13 March 2026

तमन्ना भी है, मौसम भी




तमन्ना भी है, मोसम भी,
तुम पास आओ कुछ हम भी।
सामने रखा है शिशा-ए-जिंदगी,
कुछ तुम पी लो, कुछ हम भी।

वो दूर फलक पर एक सितारा,
उसे हम देखे, तुम भी।
क्या नाम था उसका पता नहीं,
हम भूल गए, क्या तुम भी?

वक्त बितता रहा, उम्र ढलती गई,
राहें बहुत थीं और बढ़ती गई।
किसी राह पर मंज़िल न मिली,
जुस्तजू मुझे भी थी, तुम्हें भी।

कुछ परिंदे घोंसला बना रहे,
तिनको की जरूरत उन्हें भी, हमें भी।
एक दिन वो घोंसला फना होगा,
जानते वो भी हैं, हम भी।

कुछ दिल के घाव थे जो भर गए,  
जख्म फिर भी रह गए।  
क्यों न वक्त पर उन्हें छोड़ दें,  
हम भी और तुम भी।

शनिवार, १४/३/२६। , ११:४५ AM 
अजय सरदेसाई -मेघ

सख्या



तू बोल न तुझ्या डोळ्यांनी, सख्या,
ऐकेन मीही ते बोल हृदयाने, सख्या।

तुझ्या नजरेत दडलेले शब्द सारे,
उलगडू दे हळू माझ्या मनात, सख्या।

ऐकण्यास तुझे बोल एकवटले प्राण सारे,
हृदयाची धडधड येते कानात, सख्या।

रात्र ही चंद्रतारांकांची विरून जाईल हळू,
वाट तुझी पाहीन देते वचन, सख्या।

तो शुक्रतारा उगवला, मंद वाराही सुटला,
उबदार मिठी तुझी आज नाही, सख्या।

काय करू कळेना, तू लवकर ये ना,
तुझ्यासाठी कधीची मी झुरते, सख्या।

शुक्रवार, १३/३/२६. ,९:०७ PM
अजय सरदेसाई -मेघ

पतंग


पाहून ती सुंदर बाला झाला माझ्या मनाचा पतंग,
उंच भराऱ्या मारतो गगनात माझ्या मनाचा पतंग।

तिच्या तीक्ष्ण कटाक्षाने कापला दोर भरकटला पतंग।
भिरभिर भिरभिर भिरभिरतो हवेत माझ्या मनाचा पतंग ।

माझा पतंग नव्हता लेचा-पेचा, त्याची दोरी धारदार,
कापले कित्येक पेच ,कधी न बधला माझ्या मनाता पतंग।

आभाळाच्या वाटेवर हरवली माझी दिशा सारी,
वाऱ्याच्या हलक्या झुळुकीने भरकटत राहिला माझ्या मनाता पतंग।

हातात मनाचा दोर होता, तरी काहीच ना चालले माझे,
तिच्या नजरेसमोर का असहाय झाला माझ्या मनाचा पतंग।

तिच्या डोळ्यांच्या त्या जादूने सैरभैर झाले माझे मन,
क्षणात स्वप्नांच्या नभात हरवून गेला माझ्या मनाचा पतंग।

‘मेघ’ म्हणे खेळ हा पतंग-दोरीचा न्यारा निराळा,
कधी जिंकतो , कधी कटतो माझ्या मनाचा पतंग।

शुक्रवार, १३/३/२६ , १:०९ PM
अजय सरदेसाई -मेघ 

Thursday, 12 March 2026

जब दिप जले आना


चित चोर इस फिल्म के उसी गाने से  प्रेरित।

मुखड़ा:
जब दीप जले आना,
जब शाम ढले आना,
संकेत मिलन का भूल न जाना,
मेरा प्यार न बिसराना।

अंतरा १:
वो चाँद फ़लक पर तेरी राह ताक रहा,
चाँदनी उसी की है, फिर क्यों तुम्हें देख रहा?
छत पर आकर न देना तुम उसे रुप का नजराना।

मुखड़ा (दोहराव):
जब दीप जले आना,
जब शाम ढले आना,
संकेत मिलन का भूल न जाना,
मेरा प्यार न बिसराना।

अंतरा २:
तेरी ही आँखों में छुपे हैं मेरे सपने सारे,
हर शाम याद आते हैं बिते पल हमारे।
यादों से दिल अब भरता नहीं,
तुम ही मिलने आना।

मुखड़ा (दोहराव):
जब दीप जले आना,
जब शाम ढले आना,
संकेत मिलन का भूल न जाना,
मेरा प्यार न बिसराना।

अंतरा ३:
इन हवाओं में महके तेरी ही खुशबू,
हर तरफ़ मुझे बस तेरी ही जूस्तजू।
तुम बिन दिल कहीं लगता नहीं,
बहलाने दिल को मेरे तुम आना।

मुखड़ा (दोहराव):
जब दीप जले आना,
जब शाम ढले आना,
संकेत मिलन का भूल न जाना,
मेरा प्यार न बिसराना।
गुरुवार, १२/३/२६ , ९:५० PM
अजय सरदेसाई -मेघ


तिथेच


रोज संध्याकाळी तुझा निरोप घेऊन मी परत जातो, थिथेच
हळू हळू मनात तुझ्या आठवणींचा प्रकाश उजळतो, थिथेच।

तारकांचे लुकलुकणारे छत डोक्यावर साथीला असते,
तुझ्या आठवणींचा प्रत्येक तारा मोजत बसतो, तिथेच।

हवेचा हलका स्पर्श, पानांची अलवार सळसळ असते,
आपल्या मधुर भेटीचा उन्मादही भरतो, तिथेच।

स्मित तुझं डोळ्यांतून ओसंडतं, आनंदाने भरतं मन,
रोमांच फूलतो रंध्रातून, निशिगंध बहरतो, तिथेच।

तुझी नी माझी प्रित ही अनोखी गझल,
तू आणि मी — असू वा नसू — तरी भेटू निश्चित, तिथेच।

गूरुवार, १२/३/२६ , ७:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ

..... दे ना.


 

डोळ्यांत आसवांना वाहुदे ना,

आसवां वाटे दुखास जाऊदे ना।


स्मित थोडं ओठांवर राहुदे ना,

डोळ्यांना ही तेव्हा हसुदे ना।


छोटेच जरी आयुष्य असुदे ना,

जगणं मात्र मोठेच जगूदे ना।


जरी वाट कठिण, निबिड अरण्याची,

वाटेत कजव्यांचा उजेड असूदे ना।


तू नी मी आहोत अनोळखी,

ठिक आहे, ओळख करून घेऊ ना।


जाणतो, डोक्यावर छत नाही आपल्या,

आभाळ आहे, तारकांचे छत करू ना।


तुझे नी माझे सूर मिसळले एकसुरात,

सुरावटीत त्या गाणं गाऊ दे ना।


तू गुलाब, मी सुगंध तुझा सखे,

प्रेमही आपले असेच असूदे ना।


गुरुवार, १२/३/२६, ५:५० PM

अजय सरदेसाई – मेघ


मी-तू..... आपण




मी व्यक्त होतो त्या उगवत्या सूर्यांतून,
उंचच उंच त्या डोंगर शिखरांतून;
खळखळून वाहणाऱ्या स्वच्छ नदीतून,
नी उमलणाऱ्या कोमल फुलांतून.

तू व्यक्त कर न मला प्रेमातून,
तुझ्या डोळ्यांत लुकलुकणाऱ्या तेजातून;
तू कळू दे न नाते आपले जगाला,
शब्दांतून उमललेल्या त्या कवितेतून.

चल भेटू आपण नभ–मेघांच्या मैत्रीतून,
पानवाऱ्याच्या त्या मोहक सळसळीतून;
पक्ष्यांच्या गोड किलबिलाटातून,
चल भेटू अलवार त्या  भावुक क्षणांतून.

गुरुवार, १२/३/२६, ३:५० PM
अजय सरदेसाई – मेघ

पत्ता पत्ता बुटा बुटा....


मुखड़ा
पत्ता–पत्ता, बूटा–बूटा
हाल हमारा जाने है।
जाने न जाने, गुल ही न जाने,
बाग़ तो सारा जाने है।

अंतरा १
इश्क़ होकर भी न जाने क्यों छुपाते हैं लोग,
किसी पर मरकर भी न जाने क्यों छुपाते हैं लोग।
किसी का नहीं है सहारा,
यहाँ तो कोई हमारा
राज़ कहाँ पहचाने है।

अंतरा २
हर धड़कन दिल की कहती है एक अफ़साना,
हर आह साँसों की सुनाती है इक फ़साना।
ख़ामोश है सारा नज़ारा,
करता बस यही इशारा—
दिल का मर्ज़ कोई न जाने है।

अंतरा ३
चाह कर भी अक्सर चाह नहीं जताते हैं लोग,
रातों की तन्हाई में अक्सर आँसू बहाते हैं लोग।
रौशन है सारा नज़ारा,
चराग़ों का आलम है सारा—
परवानों का जलना कौन जाने है।

गुरुवार, १२/३/२६ ३:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ


मिर-तकी-मिर से प्रेरित 🙏❤️

Tuesday, 10 March 2026

मझे गोयांतले गावं


  


माका आपयता मझे छोटे तें गाव,
समिंद्राच्या कडेन ते दरी डोंगरांचे गाव.

आंबे नी माडांत ते वसलेले गाव,
फणसा बशेन मनशांचे,लाल मातीचे गाव.

भाटांच्या बांधा लागून सुपारी चे खांड,
भाटाच्या पोनांत हिरव्या नदीचो वांड.

काण्णा-चूण्णांची थय असता रेलचेल,
भाटाच्या आब्यांत चलता भुर्ग्यांचो खेळ.

दंपारचे जेवण जाल्यार मात्र माश्शे लवंडतात,
पुण ताच्या पैली सगली शित आणी हुमणाचेर ताव उडयतात.

सांज जाताच सुटता ठंड वारो किनाऱ्याचेर,
शुश्शेगाद जमता सगळी आर्तीक देवळाचेर.

तेन्नाचं किनाऱ्याचेर परतले कोळ्यांचे तारु,
माश्यान भरिल्ले ते चोणकांचे वारु.

जाली रात्र पळेय पेटले घराघरां पेट्रोमास,
आज रातच्या जेवणांत असा मासळीचे कालवण खास.

तो सप्तकोटेश्वर मजो कुलदेव वसला शांत नारव्याक.
बांदोऱ्याची ती महालक्ष्मी पळयता वात्सल्यांन आमच्या कुळाक.

माका आपयता मझे छोटे तें गाव,
मोगाचे मझे ते गोयांतले गाव.

मंगळार, १०/३/२६ , २:३५ PM
अजय सरदेसाई -मेघ


Monday, 9 March 2026

आपले घरटे (घर ते)






सत्यास सामोरे जाताच,बोलणेची खुंटले,
जुन्या आठवांचे उरले सागरात (आयुष्य ) शिंपले,
आयुष्याच्या जात्यात दळण झालो आपण,
सुंभ 'मी' चा गेला जळून तरी पिळ अजून उरले.

होते उबदार एक आपुले ही घरटे (घर ते),
पाखारांच्या किलबिलाटाने भरलेले घरटे (घर ते),
पंख फुटले त्यांना,गेले सोडून घरटे (घर ते),
आता उरले ते फक्त दोघांचे घरटे (घर ते).

चल सांभाळू जपून आपण हे घरटे (घर ते),
सोनेरी क्षणांनी हे भरलेले घरटे (घर ते),
भेटण्यास येतील दमुन पुन्हा आपली पाखरे घरट्यात,
ठेऊ त्यांच्या साठी मऊ उब या घरट्यात..... मऊ उब या घरट्यात......

मंगळवार, १०/३/२६ , ९:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Sunday, 8 March 2026

धरा नी मेघ -एक अमृतानुभव



जलधारा झंकारत बरसल्या,
मन झाले चिंब।
इंद्रधनूच्या कमानीतून
उमटले निसर्गबिंब॥


स्फुरल्या मज काव्याच्या ओळी,
शब्दांना पावसाची झिंग;
नभ मेघांनी आक्रमिले,
पसरला नभी धुंद प्रेमरंग॥


वाऱ्याची कुजबुज रानात,
जणू चहाडी पानांच्या कानात;
पानांची वाढली सळसळ,
उठली चलबिचल मनात॥


वसुंधरा ही व्याली,
बियांना कोंब फुटले;
मातीचा सुगंध दरवळता,
निसर्गाचे जडत्व सरले॥


प्रेमाची धुंदी चढली,
मेघांचे मन गहीवरले;
बाहुपाशात एकमेकांच्या,
धरा नि मेघ विरघळले॥


मेघ कोसळून स्वतः संपतो,
धरेस फुलवाया जीव अर्पितो;
प्रेमाची ही कैफियत सारी
निसर्ग स्वतःच सांगतो॥


धरा ती कृतघ्न नाही;
वैशाखात करपून जळते।
मेघाची वाफ अलवार
पुन्हा नभात सोडते॥


पुन्हा येती पावसधारा,
पुन्हा सृष्टी हिरवी फुलते।
काय वर्णन करू प्रकृतीचे,
जे या सृष्टीतच उमलते॥


मेघ-धरेच्या या मिलनात
अमृतानुभव दडला;
शिव-शक्तीचा साक्षात
अंतरी साक्षात्कार मज घडला॥



रविवार, ८/३/२६ , ०१:०४ PM
अजय सरदेसाई -मेघ

Saturday, 7 March 2026

रात्र पावसात भिजली


रात्र पावसात भिजली, तरी मन कोरडेच राहिले,
मन भरलं नाही अजून, आपलं बोलणंच राहिले।

पाऊस रिपरिपत होता, डोळे डबडबले होते,
तुला सांगायचं होतं मनातलं, ते तसेच राहिले।

गळ्यात कण्हत होती एक अगम्य वेदना,
ओल्या रिमझिमीतही शब्द माझे कोरडेच राहिले।

हातात हात घेऊन वाट पाहिली मी त्या क्षणाची,
सरींमध्ये भिजूनही स्पर्शात ते आमंत्रणच न राहिले।

तुझे स्मित ते मोहक, मन हरपून गेले,
घर आपलं आजही तुझी वाट पाहते, ते रिकामेच राहिले।

पाऊस बरसला आणि रात्र भिजली माझी,
कोणास ठाऊक का तरी ओठ कोरडेच राहिले।

शनिवार, ७/२/२६ , ९:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

उनकी निगाहों के साए


 
हर पल देखते हैं उनकी निगाहों के साए,
मुझे चूमते हैं उनकी निगाहों के साए।

ऐसे पल भी आए हैं हैरान जिंदगी में,
मुझे चुभते हैं उनकी निगाहों के साए।

कड़ी धूप में जब झुलझ गए हम,
याद आए तब उनकी निगाहों के साए।

ये प्यास कैसी,ये तमन्ना क्यूँ हैं उभरी,
मुझे समेट लें उनकी निगाहों के साए।

धड़कता ये दिल इतनी घब्राहट क्यों है,
छिन न ले कोई उनकी की निगाहों के साए।

शनिवार, ७/२/२६ , १२:१० PM
अजय सरदेसाई -मेघ

“जनाब जाँ निसार अख्तर की ग़ज़ल ‘उनकी निगाहों के साए’ से मुतास्सिर।”
फिल्म: प्रेम परबत

Friday, 6 March 2026

माझ्या हातात नाही



तुझ्यावर प्रेम न करणं माझ्या हातात नाही,
तुझ्यावर प्रेम करणंही माझ्या हातात नाही।

तुझ्या एका कटाक्षाने उजळतं माझं सारं जग,
तो आनंद लपवणं माझ्या हातात नाही।

हृदयाची धडधड वाढते तू जवळ असताना,
हृदयास समजावणं माझ्या हातात नाही।

नाव तुझं ओठांवर नकळत येतंच कधी,
त्या शब्दांना आवरणं माझ्या हातात नाही।

मनास कितीदा आवरलं मी, तुला माहीत नाही,
स्वप्नांत टाळणं तुला माझ्या हातात नाही।

आठवण तुझी स्वैर वारा — झुळूक येते नि जाते,
तुझं ते येणं नि जाणं माझ्या हातात नाही।

तू दूर असलीस, तरी मनातच राहतेस,
तुला त्या घरातून हुसकावणं माझ्या हातात नाही।

शुक्रवार, ६/२/२६ , ०१:१२ PM
अजय सरदेसाई -मेघ

Wednesday, 4 March 2026

तू आणि मी, आणि न कुणी...


बंद १

तुझ्या नी माझ्यात कविताच एक दुवा,
मी करायची, तू वाचायची, हा खेळ हवा.
मी लिहिते, तू वाचतो,
मी रचते, तू म्हणतो,
शब्द पाझरतात, जणू पानांवर पसरतात,
तुमच्या मनाच्या कोपऱ्यात जणू हलकेच स्पर्श करतात,
खेळ सुरु राहतो — फक्त तुझा आणि माझा, आणि न कुणाचा.

बंद २

तुझ्यातली कविता हळू हळू माझ्यात मिसळते,
भावना तुझ्या, शब्द माझे,
छंद तुझे, बंद माझे.
शब्द फक्त पानांवर उमटतात,
हात कधीच भिडत नाही, पण मन जुळतात,
क्षणभर डोळ्यांतून निघालेली जाणीव हळूच मनात घर करते.
फक्त तुझ्या नी माझ्या, आणि कुणाच्या?

बंद ३

क्षणभराची स्मितहास्याची झळकण,
दूर असतानाही जवळ वाटणं,
अनंत अंतर, अनामिक स्पर्श,
कविता संपते, पण प्रेम उरते,
हळू हळू आठवणींच्या सावलीत जणू टिकते,
फक्त तू आणि मी जाणतो, आणि न कुणीच....


गुरुवार, ४/२/२६ , ९:५४ PM
अजय सरदेसाई -मेघ

Tuesday, 3 March 2026

आठवांचे मोती


 


चंद्राने शिंपिले ताऱ्यांनी सर्व आसमंत,
दरवळते रात्र रंध्रांत, झिरपतं चांदणं नभात।

सानिध्य तुझे दाटले मनाच्या अंतरडोहांत,
कलावतीची सुरावळ गुंजते दूर डोंगरात।

सागराच्या निळडोहांत शिंपल्यात दडले मोती,
तुझ्या आठवांच्या जणू जपून ठेवल्या ज्योती।

प्रेमाची ही प्रेमवेल चढली हृदयास वेढूनी,
मी गुंतलो त्या वेलीत तुझ्या स्मरणांत बिलगूनी।

शब्द सारे विरले, उरला फक्त श्वासात गंध,
अलवार तो सुगंध ठेवला मी मनात बंद।

गुरुवार, ४/०२/२०२६ — ११:३५ AM
अजय सरदेसाई — ‘मेघ’



Monday, 2 March 2026

वामकुक्षी



दुपारचे जेवण झाले, आता एक डुलकी पाहिजे,
वार्‍याची झुळूक अंगावर अलवार फिरली पाहिजे।

डोळ्यांच्या कडा मिटताच स्वप्नांची सावली यावी,
मनाची सारी धावपळ क्षणभर थांबली पाहिजे।

आकाशी ढग तरंगती, शांत निळी ती छाया,
छपरावर पावसाची चाहूल हलकेच लागली पाहिजे।

घड्याळाचाही काटा जरा मंद फिरला पाहिजे,
या धकाधकीच्या जगातून थोडी विश्रांती मिळाली पाहिजे।

‘मेघ’ म्हणे या भरदुपारी जीवास जरा विसावा पाहिजे,
स्वप्नांच्या या सावलीत निवांत झोप लागली पाहिजे।

शनिवार, २८/२/२६ , १२:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ

आठवण



दशके सरली तरी तुझी आठवण आली नाही,
असं असूनही तुझी आठवण कधी ओसरली नाही।

विस्मरणाचा धीर मनाला कधीच जमला नाही,
दूर असूनही तू मनातून कधी दूर झाली नाही।

काळाच्या गर्दीत मी स्वतःलाच हरवून बसलो,
मनातल्या आपल्या त्या विणीची गाठ तुटली नाही।

ओठांवर शांतता, डोळ्यांत ओल दाटून आली,
दुःखाची सल जिवघेणी तरी ओढ अंतरी विरली नाही।

‘मेघ’ म्हणे, अंतर वाढले तरी नातं तुटलं नाही,
डोळ्यांआड असूनही तू स्मरणातून गेली नाही।

शनिवार, २८/०२/२०२६ | ११:४५ PM
अजय सरदेसाई — ‘मेघ’

मय




मय चीज़ ऐसी है जो 'मैं 'को भुला देती है,
हर इंसान को अपने रंग में रंगा देती है।

दिल के सारे शिकवे, ग़म धुएँ में उड़ा देती है,
ख़ुष्क रूह में भी जैसे नमी-सी जगा देती है।

होश वालों की दुनिया को ज़रा दूर हटा देती है,
दो घड़ी के लिए बंदे को खुदा-सा बना देती है।

कौन अपना है, कौन पराया — सब भुला देती है,
एक प्याले में सारी फ़ासले मिटा देती है।

साक़ी की एक नज़र दिल में उजाला देती है,
बुझती हुई हर लौ को फिर से जला देती है।

जब-जब ये लबों से लगी, पर्दे गिरा देती है,
अंदर की हर फ़ितरत को खुल के हवा देती है।

मैं ढूँढता फिरता हूँ जिसे सारी उम्र भर,
मय हँस के उसी राह का पता बता देती है।

खुशकिस्मत हैं जिन्हें मय से परहेज़ नहीं,
ये वो शय है जो 'ख़ालिक़ 'से मिला देती है।

— अजय सरदेसाई ‘मेघ’
रविवार, १/३/२६ , १०:४५ AM

भेट


काळ रेंगाळला डोळ्यांच्या त्या पापण्यांवर,
स्पर्श तुझा अजुनी जिवंत माझ्या तनुवर।

तुझ्या अवचित भेटीचे क्षण मयूरपंखी,
आजही भास त्यांचा अलवार माझ्या मनावर।

पावलांत विसावले ओळखीचे सारे रस्ते,
पाऊलखुणा सांगती त्या भेटींचे किस्से वळणावळणावर।

डोळ्यांत दाटलेला तोच प्रकाश धूसरसा,
काळही विसावला त्या आठवांच्या काठावर।

भेटतोस स्वप्नांत अवचित चांदण्यांच्या राती,
शब्दांविन अर्थ स्पर्शांतच उमटवून जातोस मनावर।

जागेपणी उरते ती हळवी जाणीव पूर्ण,
आयुष्य वाहतं पुढे त्याच जाणीवेच्या आधारावर।

शुक्रवार, २७/२/२६ ९:३० PM
— अजय सरदेसाई ‘मेघ’

Sunday, 1 March 2026

मैत्रीचं आंदण



 दे पुन्हा एकदा हात हातात,
चल पुन्हा जाऊ त्या रानात।
पुन्हा ऐकू चल ते वनाचे गाणे,
चल ना सखे, सोड सारे बहाणे।
रानवारा झाडांत सळसळला,
भृंग कमळांत जाऊन बसला।
पारवा टिवटिवला दूर कोठे,
आवाज त्याचा बनांत साठे।
चल रानमेवा खुणावतो अजून,
चिंचा-बोरी पाहती वाट अजून।
चल बसू या तलावाच्या काठावर,
दगडांनी उठवू तरंग त्या पाण्यावर।
तु झालीस लेकुरवाळी, मी गृहस्थचारी,
वयाने का आणली मैत्रीत ही लाचारी?
चल देऊ झुगारून वयाचे बंधन,
चल पुन्हा घेऊ ते मैत्रीचे आंदण।
चल बसू पुन्हा शाळेच्या त्या बाकावर,
घंटा होताच पळू पुन्हा रानावर।
उरली आयुष्यात वेळ खूप थोडी,
चल चाखू पुन्हा रानमेव्याची गोडी।
सखे, दे पुन्हा एकदा हात हातात,
चल ना पुन्हा जाऊ त्या रानात।


रविवार, १/३/२६ , १२:५२ PM
अजय सरदेसाई -मेघ

Thursday, 26 February 2026

कवीस काय हवं?


कवीस काय हवं?
एक सुचलेली ओळ,
नको शब्दांचा घोळ।

कवीस काय हवं?
पाठीवर कौतुकाची थाप,
सुचाव्या कविता अमाप।

कवीस काय हवं?
एक लिहिण्याची प्रतिभा,
मनात असंख्य प्रतिमा।

कवीस काय हवं?
एक कल्पनांचा गाव,
आणि हृदयाचा ठाव।

कवीस काय हवं?
एक फसलेलं प्रेम,
समोर तिची फ्रेम।

कवीस काय हवं?
एक संवेदनशील मन,
लिहिण्यास साधंसं पेन।

गुरुवार, २६/०२/२६ — ९:०० PM
अजय सरदेसाई ‘मेघ’

अस्तित्व


 

हे दृश्य-अदृश्य अस्तित्व फक्त माझ्यासाठी आहे,

माझंच अस्तित्व नसेल तर तेही कुठे आहे?

अस्तित्वातून जाणीव उठते, जाणीवेतून हे सगळं जग,

उरतो तो फक्त आभास — जरा डोळे मिटून बघ.

शरीर मिथ्या, जगत मिथ्या — उरतो फक्त ‘मी’,

‘मी’ कोण आहे? अस्तित्व हे उकलून बघ.

उकलता उकलता शेवटी, ‘मी’ही विरघळून जाईल,

उरेल फक्त अस्तित्वाची जाणीव… बघ.

ही जाणीवही शेवटी विरून जाईल,

उरेल ते फक्त अस्तित्व — ते कुणाचं, कुणास ठाऊक… बघ!


गुरुवार, २६/२/२६ , ६:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ

नीवृत्ती



दुःखाच्या सागरात सांज आयुष्याची होती,
चांदण्यांची चमचम, चंद्राची शीतलता होती।

झोपेच्या बिछान्याची जरी पोत काटेरी होती,
न कसलीच टोच होती, मनात शांतता होती।

सुखदुःखाची काहीच न चिंता होती,
संवेदना बोथट झाल्या, एक विरक्ती होती।

मला उधळण्यास जरी वादळांची दाटी होती,
डोक्यात तरीही एक निबिड शून्यता होती।

डोळे बंद होते, फक्त स्पंदनाची धडधड होती,
आयुष्याच्या क्षणांची गोळाबेरीज चालली होती।

बाहेरून मला किती स्वप्न खुणावत होती,
मी बधलो नाही त्यांना, जगण्यात निवृत्ती होती।

गुरुवार, २६/२/२६ , ३:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

Wednesday, 25 February 2026

स्वप्न


 


कधीतरी मीही तरुण होतो
तिच्या डोळ्यांत अरुण होतो

आयुष्य एक उत्सव होता
मी जगण्यात रमून होतो

जीवन होते तरल गाणे
गाण्यात मी रंगून होतो

स्वप्ने सारी साकारत होती
स्वप्नांच्या दुनियेत गुंतून होतो

आयुष्य छान सरकत होते
मी आकंठ स्वतःत बुडून होतो

अचानक मला ती भेटली होती
ते क्षण अलवार जपून होतो

तिच्या लाघवी सहवासात
स्वतःलाही मी विसरून होतो

अचानक कशी न जाणे जाग आली
कळले ते स्वप्न होते, मी स्वप्न जगून होतो

उरले उरात काही आभास चांदण्यांचे 
ते चांदणे अजुनही मनात जपून होतो
 
गुरुवार, २६/२/२६ , १२:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ

निखळून एक तारा ....

 


निखळून एक तारा पडला खाली, 
पडताना आकाश उजळून गेला।

वारा सुसाट सुटला होता खिडकीबाहेर, 
सहज आत डोकावून गेला।

दोघांची चुकामूक झाली, भेट न झाली; 
तो आत्ताच आला नि हा आत्ताच गेला।

मनातले शब्द काही ओठांवर आलेच नाहीत; 
हुंदका हलकेच अश्रूत बदलून गेला।

काही न बोलता तिने फक्त एकदाच पाहिले,
तो कटाक्ष आयुष्याचा अर्थच बदलून गेला ।

अंधार सावल्यांचा खुप गडद झाला, 
प्रकाश बघता बघता विरुन गेला।

राखेतला निखारा पुन्हा पेटला,
झळ बसली खरी - पण उब देऊन गेला।

बुधवार, २५/२/२६ , ८:४४ PM
अजय सरदेसाई -मेघ