प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 21 March 2026

तो अन ती


 

तो:
तू म्हणशील तर तेही करु!
तू सांग न आधी काय करु?

मी चंद्र नी तारे तोडून आणू?
तू सांग न, तेही करु?

मी तुझ्यावर प्रेम तर करतोच!
तू सांग, आणि काय करु?

तो वारा बिलगून जातो तुला!
द्वेष वाटतो त्याचा, काय करु?

तुझ्या डोळ्यात स्वप्नं पाहिले एक,
तू सांग न, ते साकार करु?

तुझ्यावर माझी प्रीती पुराणी,
तू सांग कशी ती दूर करु?

तू प्रेरणा माझी, मी तुझा प्रेरित,
मी तुझ्यावर कविता करतो, करु?

तू सांग न सखे, मी काय करु?
तू जे म्हणशील ते आपण करु!

ती:
तू म्हणतोस, तर तेही करशील,
मी सांगू का खरंच काय करशील?

चंद्र नी तारे तोडून आणू म्हणतोस,
मी म्हणेन—फक्त माझाच बनुंन राहशील?

तू म्हणतोस, प्रेम करतोस खूप,
मी विचारते—स्वतःलाही तितकंच जपशील?

तो वारा बिलगून जातो मला,
मत्सर नको रे… तू स्वतःला त्यात पाहशील?

माझ्या डोळ्यांत स्वप्न पाहिलंस म्हणतोस,
मी म्हणेन—ते स्वप्न आधी तूही जगशील?

तुझी प्रीती पुराणी म्हणतोस जरी,
मी म्हणेन —ती नव्याने दररोज फुलवशील?

तू म्हणतोस, मीच प्रेरणा तुझी,
मी म्हणेन—तुझ्यातलाच ‘मेघ’ तू शोधशील?

तू विचारतोस, “सखे, मी काय करु?”
मी हसून—“फक्त माझ्या निकट राहशील?”

तू जे म्हणशील ते आपण करू म्हणतोस,
मी म्हणेन—“आपणांत कोणतेच प्रश्न न येऊ देशील?

शुक्रवार, २०/३/२६ , ११:०१ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment