प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Tuesday, 31 March 2026

काय खरं - सांग बरं?


सुरवंटांतून निघतात फुलपाखरं,
सुरवंट की फुलपाखरू — काय खरं?

बंद कळींतून उमलतं फुल गोजिरं,
कळी की फुल — काय खरं?

दिवसातून रात्र येते, रात्रीतून पुन्हा दिवस,
दिवस की रात्र — आधी कोण, सांग बरं?

झऱ्याचा विस्तार नदीत, नदीचा सागरात,
अस्तित्व जाते कुठं त्यांचं, सांग बरं?

बालकातून तरुण जन्मतो, तरुणातून प्रौढ,
क्षणात बदलतं शरीर — मरतं का जन्मतं, सांग बरं… काय खरं?

सतत सगळं बदलतं, तूषार्त काय शोधतो,
कोण शांत साक्षी याचा — सांग बरं?

बदलतं स्वरूप मिथ्या, तत्त्व आतलं खरं,
उमगलं का नाही, सांग बरं?


मंगळवार, ३१/३/२६, ४:०५ PM
अजय सरदेसाई - मेघ

No comments:

Post a Comment