प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....
Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Monday, 2 March 2026

वामकुक्षी



दुपारचे जेवण झाले, आता एक डुलकी पाहिजे,
वार्‍याची झुळूक अंगावर अलवार फिरली पाहिजे।

डोळ्यांच्या कडा मिटताच स्वप्नांची सावली यावी,
मनाची सारी धावपळ क्षणभर थांबली पाहिजे।

आकाशी ढग तरंगती, शांत निळी ती छाया,
छपरावर पावसाची चाहूल हलकेच लागली पाहिजे।

घड्याळाचाही काटा जरा मंद फिरला पाहिजे,
या धकाधकीच्या जगातून थोडी विश्रांती मिळाली पाहिजे।

‘मेघ’ म्हणे या भरदुपारी जीवास जरा विसावा पाहिजे,
स्वप्नांच्या या सावलीत निवांत झोप लागली पाहिजे।

शनिवार, २८/२/२६ , १२:४५ PM
अजय सरदेसाई -मेघ

आठवण



दशके सरली तरी तुझी आठवण आली नाही,
असं असूनही तुझी आठवण कधी ओसरली नाही।

विस्मरणाचा धीर मनाला कधीच जमला नाही,
दूर असूनही तू मनातून कधी दूर झाली नाही।

काळाच्या गर्दीत मी स्वतःलाच हरवून बसलो,
मनातल्या आपल्या त्या विणीची गाठ तुटली नाही।

ओठांवर शांतता, डोळ्यांत ओल दाटून आली,
दुःखाची सल जिवघेणी तरी ओढ अंतरी विरली नाही।

‘मेघ’ म्हणे, अंतर वाढले तरी नातं तुटलं नाही,
डोळ्यांआड असूनही तू स्मरणातून गेली नाही।

शनिवार, २८/०२/२०२६ | ११:४५ PM
अजय सरदेसाई — ‘मेघ’

भेट


काळ रेंगाळला डोळ्यांच्या त्या पापण्यांवर,
स्पर्श तुझा अजुनी जिवंत माझ्या तनुवर।

तुझ्या अवचित भेटीचे क्षण मयूरपंखी,
आजही भास त्यांचा अलवार माझ्या मनावर।

पावलांत विसावले ओळखीचे सारे रस्ते,
पाऊलखुणा सांगती त्या भेटींचे किस्से वळणावळणावर।

डोळ्यांत दाटलेला तोच प्रकाश धूसरसा,
काळही विसावला त्या आठवांच्या काठावर।

भेटतोस स्वप्नांत अवचित चांदण्यांच्या राती,
शब्दांविन अर्थ स्पर्शांतच उमटवून जातोस मनावर।

जागेपणी उरते ती हळवी जाणीव पूर्ण,
आयुष्य वाहतं पुढे त्याच जाणीवेच्या आधारावर।

शुक्रवार, २७/२/२६ ९:३० PM
— अजय सरदेसाई ‘मेघ’

Sunday, 1 March 2026

मैत्रीचं आंदण



 दे पुन्हा एकदा हात हातात,
चल पुन्हा जाऊ त्या रानात।
पुन्हा ऐकू चल ते वनाचे गाणे,
चल ना सखे, सोड सारे बहाणे।
रानवारा झाडांत सळसळला,
भृंग कमळांत जाऊन बसला।
पारवा टिवटिवला दूर कोठे,
आवाज त्याचा बनांत साठे।
चल रानमेवा खुणावतो अजून,
चिंचा-बोरी पाहती वाट अजून।
चल बसू या तलावाच्या काठावर,
दगडांनी उठवू तरंग त्या पाण्यावर।
तु झालीस लेकुरवाळी, मी गृहस्थचारी,
वयाने का आणली मैत्रीत ही लाचारी?
चल देऊ झुगारून वयाचे बंधन,
चल पुन्हा घेऊ ते मैत्रीचे आंदण।
चल बसू पुन्हा शाळेच्या त्या बाकावर,
घंटा होताच पळू पुन्हा रानावर।
उरली आयुष्यात वेळ खूप थोडी,
चल चाखू पुन्हा रानमेव्याची गोडी।
सखे, दे पुन्हा एकदा हात हातात,
चल ना पुन्हा जाऊ त्या रानात।


रविवार, १/३/२६ , १२:५२ PM
अजय सरदेसाई -मेघ

Thursday, 26 February 2026

कवीस काय हवं?


कवीस काय हवं?
एक सुचलेली ओळ,
नको शब्दांचा घोळ।

कवीस काय हवं?
पाठीवर कौतुकाची थाप,
सुचाव्या कविता अमाप।

कवीस काय हवं?
एक लिहिण्याची प्रतिभा,
मनात असंख्य प्रतिमा।

कवीस काय हवं?
एक कल्पनांचा गाव,
आणि हृदयाचा ठाव।

कवीस काय हवं?
एक फसलेलं प्रेम,
समोर तिची फ्रेम।

कवीस काय हवं?
एक संवेदनशील मन,
लिहिण्यास साधंसं पेन।

गुरुवार, २६/०२/२६ — ९:०० PM
अजय सरदेसाई ‘मेघ’

अस्तित्व


 

हे दृश्य-अदृश्य अस्तित्व फक्त माझ्यासाठी आहे,

माझंच अस्तित्व नसेल तर तेही कुठे आहे?

अस्तित्वातून जाणीव उठते, जाणीवेतून हे सगळं जग,

उरतो तो फक्त आभास — जरा डोळे मिटून बघ.

शरीर मिथ्या, जगत मिथ्या — उरतो फक्त ‘मी’,

‘मी’ कोण आहे? अस्तित्व हे उकलून बघ.

उकलता उकलता शेवटी, ‘मी’ही विरघळून जाईल,

उरेल फक्त अस्तित्वाची जाणीव… बघ.

ही जाणीवही शेवटी विरून जाईल,

उरेल ते फक्त अस्तित्व — ते कुणाचं, कुणास ठाऊक… बघ!


गुरुवार, २६/२/२६ , ६:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ

नीवृत्ती



दुःखाच्या सागरात सांज आयुष्याची होती,
चांदण्यांची चमचम, चंद्राची शीतलता होती।

झोपेच्या बिछान्याची जरी पोत काटेरी होती,
न कसलीच टोच होती, मनात शांतता होती।

सुखदुःखाची काहीच न चिंता होती,
संवेदना बोथट झाल्या, एक विरक्ती होती।

मला उधळण्यास जरी वादळांची दाटी होती,
डोक्यात तरीही एक निबिड शून्यता होती।

डोळे बंद होते, फक्त स्पंदनाची धडधड होती,
आयुष्याच्या क्षणांची गोळाबेरीज चालली होती।

बाहेरून मला किती स्वप्न खुणावत होती,
मी बधलो नाही त्यांना, जगण्यात निवृत्ती होती।

गुरुवार, २६/२/२६ , ३:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

Wednesday, 25 February 2026

स्वप्न


 


कधीतरी मीही तरुण होतो
तिच्या डोळ्यांत अरुण होतो

आयुष्य एक उत्सव होता
मी जगण्यात रमून होतो

जीवन होते तरल गाणे
गाण्यात मी रंगून होतो

स्वप्ने सारी साकारत होती
स्वप्नांच्या दुनियेत गुंतून होतो

आयुष्य छान सरकत होते
मी आकंठ स्वतःत बुडून होतो

अचानक मला ती भेटली होती
ते क्षण अलवार जपून होतो

तिच्या लाघवी सहवासात
स्वतःलाही मी विसरून होतो

अचानक कशी न जाणे जाग आली
कळले ते स्वप्न होते, मी स्वप्न जगून होतो

उरले उरात काही आभास चांदण्यांचे 
ते चांदणे अजुनही मनात जपून होतो
 
गुरुवार, २६/२/२६ , १२:१५ PM
अजय सरदेसाई -मेघ

निखळून एक तारा ....

 


निखळून एक तारा पडला खाली, 
पडताना आकाश उजळून गेला।

वारा सुसाट सुटला होता खिडकीबाहेर, 
सहज आत डोकावून गेला।

दोघांची चुकामूक झाली, भेट न झाली; 
तो आत्ताच आला नि हा आत्ताच गेला।

मनातले शब्द काही ओठांवर आलेच नाहीत; 
हुंदका हलकेच अश्रूत बदलून गेला।

काही न बोलता तिने फक्त एकदाच पाहिले,
तो कटाक्ष आयुष्याचा अर्थच बदलून गेला ।

अंधार सावल्यांचा खुप गडद झाला, 
प्रकाश बघता बघता विरुन गेला।

राखेतला निखारा पुन्हा पेटला,
झळ बसली खरी - पण उब देऊन गेला।

बुधवार, २५/२/२६ , ८:४४ PM
अजय सरदेसाई -मेघ

Tuesday, 24 February 2026

तू-अन-मी

 


तू नदी होऊन आलीस, मी सागर — माझ्यात तूच आहेस,
प्रत्येक श्वासात माझ्या अंतरी तूच आहेस।

तू स्वरांची गूज हळवी, मी त्या गाण्याचा श्वास,
तालाच्या प्रत्येक ठोक्यात दडलेली तूच आहेस।

तू दीपाच्या ज्योतीसारखी, मी वात तुझ्या साथीत,
काळोख्या रात्रीतला प्रकाश तूच आहेस।

तू मातीची ओल गहिरी, मी बीज तुझ्या कुशीत,
फुलणाऱ्या प्रत्येक फुलांत सुगंधित तूच आहेस।

‘मेघ’ म्हणे, वेगळेपणाचा उरला नाही भास आता,
शोधत फिरलो जिला ती — सखी, तूच आहेस।

मंगळवार, २४/२/२६ , ७:५० PM
अजय सरदेसाई -मेघ

तू लिही


 
घे हे पान कोरे, काहीतरी लिही,
गद्य असो किंवा पद्य, तू लिही।

शब्दांना जागे कर, उठव आणि लिही,
स्रोतांना वाहू दे कागदावर… लिही।

मनात दडलेले धूसर शब्द बाहेर येऊ दे, लिही,
एखादा थेंब होऊन ओळींतून टपू दे, लिही।

जखमा असतील तर त्यांची खपली काढ, लिही,
आठवणींना जरा मोकळं कर, लिही।

रितेपणाच्या या शांत प्रहरी, लिही,
स्वतःशीच साध संवाद, लिही।

जागव प्रतिभा, कर साकार शब्दप्रतिमा, लिही,
‘मेघ’ समजतोस कवी स्वतःला ना, मग लिही।

कर कविता, कर गझल, एखादा लेख लिही,
किंवा तापल्या शब्दांचे आक्रंदन लिही, पण लिही।

शब्दांशी साध संधान, तोड बंधन, लिही,
मनाचा लगाम सोड, स्वैर हो, लिही।

मंगळवार, २४/२/२६ , ४:२५  PM
अजय सरदेसाई -मेघ

तू हे करू नकोस


माझ्यावर प्रेम करू नकोस,
माझ्यासाठी झुरूही नकोस,
मी माणूस बेभरवशाचा आहे,
माझ्यावर भरोसा ठेवू नकोस।

इकडे-तिकडे पाहू नकोस,
भलतीकडेच जाऊ नकोस,
आरशाची नजर लागेल तुला,
इतका शृंगार करू नकोस।

कविता माझी वाचू नकोस,
गझल माझी ऐकू नकोस,
उगाच प्रेम बसेल माझ्यावर,
इतकी गाफील राहू नकोस।

स्वप्नांत माझ्या येऊ नकोस,
हळूच माझे नाव घेऊ नकोस,
मन हे वेडं भुलून जाईल,
इतकं जवळ येऊ नकोस।

माझ्यात मन वळवू नकोस,
हृदय तुझे गुंतवू नकोस,
हा ‘मेघ’ आहेच क्षणभंगुर,
याच्यावर आस लावू नकोस।

मंगळवार, २४/२/२६, १०:०१ PM
— अजय सरदेसाई ‘मेघ’

Monday, 23 February 2026

पुरे ते बहाणे


 

प्राजक्तांची आज बरसात झाली,
आकाशात तारकांच्या उमलल्या चंद्रवेली!
वाहणारा वारा टाकतो उसासे,
न भेटताच आज तू का निघून गेली?

पुळणीवरची पाऊले तुझी लाटेने पुसून नेली,
शोधू कुठे सखे तुला, तू कुठे गेली?

व्याकुळ हृदय माझे, व्याकुळ नजरा,
तुझ्याविना माळू प्रिये कोणास हा गजरा?

तीन्हीसांजा झाल्या, सूर्यही मावळतीस आला,
तुझ्या स्वागतास चंद्र आतुर झाला.

तुझ्याचसाठी गातो मी प्रणय गाणे,
हा रुसवा सोड सखे, पुरे ते बहाणे.

सोमवार, २३/२/२६, ८:२० PM
अजय सरदेसाई – मेघ

Sunday, 22 February 2026

बहर


 


पानापानांत हिरवा रंग बहरला,
सौंदर्यात तुझ्या आज वसंत बहरला।

पाहताच ती वसंतसेना हसली जरा,
आणि मनात माझ्या अनुराग बहरला।

शब्द जे साठले होते ओठांत माझ्या,
आता ग़ज़लांचा एक उत्सव बहरला।

स्वप्नजा होत्या कधी आकांक्षा माझ्या,
सत्यात त्यांचा कल्प वृक्ष बहरला।

मनाच्या वीणेवर सूर अलगद कोणी छेडले,
आणि हृदयात माझ्या  अलवार यमन बहरला।

सोमवार, २३/२/३६ , १२:४० PM
अजय सरदेसाई -मेघ

Saturday, 21 February 2026

नक्षत्रांचे देणे


भेटलो आयुष्यात आपण हे नक्षत्रांचे देणे,
ओघळते अश्रू गालावर, नव्हे दुःख, हे आनंदाचे लेणे।

तू चंद्र, मी चकोर, भेट आपली चांदण्यातली,
तू द्यावे, मी घ्यावे, साधले कैवल्याचे जीणे।

सप्त सुरांनी सजवले लयबद्ध जीवन गाणे,
क्षण आपल्या आयुष्याचे प्रितीचे गोड तराणे।

गात्रा-गात्रांत शिंपले तू थेंब अमृताचे,
जीवन झाले तृप्त आपले, जणू चांदण्यांचे लेणे।

मंद ज्योती सम तेवतेस तू हृदय-देव्हार्यात,
तू लक्ष्मी माझ्या घरची, मज आणि न काही नेणे।

रवीवार, २२/२/२६ , ११:२२ AM 
अजय सरदेसाई -मेघ



तुझे नी माझे जग आठवांचे


गेलेल्या दिवसांनो परत या फिरुनी,
त्या आठवणींच्या रेशमात जरा गुंतूनी।

त्या हरवलेल्या क्षणांत मी ही हरवून जावे,
आकाशात तारकांच्या तू चंद्र होऊन जावे।

आकांक्षांचे आयुष्याशी कधी गणित का न जुळावे,
तुजविण सांग, सखे, आयुष्य कसे जगावे।

एक क्षण एक युग होतो, मी क्षणो-क्षणी तडफडतो,
आठवणींच्या भावविश्वात मी पुन्हा शांत होतो।

हे भावविश्व तुझे नि माझे अजून जिवंत आठवांत,
भेटू चल, सखे, पुन्हा आपण त्या जगात।

शनिवार, २१/२/२६ , १०:१० PM
अजय सरदेसाई -मेघ

रात्र अमृताची ( अजुन एक दृष्टिकोन)



किंचित सुवास दरवळला,
जराशीच चाहूल होती,
वळून पाहिले जरा मी —
समोर उभी तूच होती।

क्षणभर सळसळला वारा,
पानांत कुजबुज होती,
त्या निवांत धुंद वाटेवर
फक्त तुझीच साथ होती।

शब्द कधीच संपले होते,
नजरेतच बोलणं होतं,
त्या शांत संध्याछायेत
मन तुझ्यात विरघळत होतं।

हातात हात तुझा होता,
मनाचं फुलपाखरू होतं,
चंद्र ताऱ्यांनी वेढला होता,
धुक्याचं पांघरुण होतं।

मन हरखून गेले होते,
आशा पल्लवित होती,
डोळ्यांत तुझ्या पाहिली —
ती रात्र अमृताची होती।

शनिवार २१/२/२६ , ९:०५ PM
अजय सरदेसाई -मेघ 

तुझ्या स्मृतींचे क्षण


तुझ्या स्मरणात गेले उरलेल्या आयुष्याचे क्षण,
पुन्हा पुन्हा जगतो मी ते विरलेले मधुर क्षण।

माझी कविता ऐकून तू अनाहुत लाजलिस,
अजून डोळ्यांसमोर आहे तो गुलाबी क्षण।

तुझा स्पर्श होता जणू स्पर्श आयुष्याचा,
हृदयात जपून ठेवला अजूनही तो हळुवार क्षण।

तुझ्या ओठांत दडलेले किती अबोलसे अर्थ,
तू न बोलताही सारे मला उमजलेले ते क्षण।

तुझ्या पैंजणांची रुणझुण ऐकत सरले आयुष्य,
चांदण्यात भिजून गेले ते निःशब्द तारकांचे क्षण।

हात-हातात-घेऊन-तू ... सोडला-निःश्वास
गोठला-हृदयात-माझ्या ... तो-विरहाचा-क्षण

विरहाच्या सांजवेळी धूसर झाला सारा संसार,
तरी अंतरी उजळत राहिले तुझ्या स्मृतीचे ते क्षण।

शनिवार, २१/२/२६ , ६:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

रात्र अमृताची (वेगळा दृष्टिकोन)


भोगता-भोग्य एक झाले, गाथा संपली तिमीराची,
शमली सर्व गात्रं-गात्र, होती रात्र अमृताची।

जे का दिसते भासते, असतेच का ते सत्य?
निर्विकल्पांत गेलो जेव्हा, मिटले सर्व मिथ्य।

कोण असे ह्या ब्रह्मांडाचा अनभिषिक्त स्वामी?
आंत जाऊनी पाहिले जेव्हा, दिसलो फक्त मीच।

‘मी’स जाऊन शोधले अजून खूप खोल,
उरली जाणिव अस्तित्वाची फक्त, नव्हते कुणीच।

देखावा तो कसा होता, वर्णू कसे ते अंबर,
जणू अंबराच्याच कुशीत निजलेले एक अंबर।

शनिवार, २१/२/२६, ३:३२ PM
— अजय सरदेसाई ‘मेघ’

Thursday, 19 February 2026

मराठी नज़्म — देव जाणे… देवच जाणे





(बंद १)
उमटले शब्द — जणू रक्ताचे थेंब, अलगद कागदावर,
ओळी-ओळीत कुणाचे नि:शब्द दुःख दाटलं मनावर,
मी हरवून बसलो स्वतःमध्येच, दुःख बरसू लागलं मनावर,
आत कुणीतरी माझ्याऐवजी लिहीत राहिलं शांतपणे…
कसं घडलं हे सगळं — देव जाणे… देवच जाणे.

(बंद २)
सलणारी रात्र सावलीसारखी येऊन शेजारी बसली,
आठवणींच्या उंबरठ्यावर चाहूल तुझी अलगद विसावली,
डोळ्यांतून ठिणगी ओली, बनून शाई विरघळली शब्दांवर,
एक ठिणगी काळोखाशी झगडत राहिली रात्रभर…
का पेटली होती ती — देव जाणे… देवच जाणे.

(बंद ३)
अक्षरांत धुके दाटे, नजरेत पाणी साचतं,
प्रत्येक ठोक्यात तुझं नाव कोण हळूच कुजबुजतं,
रडता-रडता वेदनांचं गाणं अलगद आकार घेतं,
मन स्वतःलाच ऐकत राहतं — नि:शब्द, स्तब्ध…
ही गझल कधी जन्मली — देव जाणे… देवच जाणे.

(बंद ४)
खोली रिकामी नि: थंड, भिंतींवर दाटी सावल्यांची,
पायांशी रास साचली मोडक्या स्वप्नांच्या तुकड्यांची,
उजाड मनाने तरी तुझीच प्रतिमा जपली,
विराणीत कुणी फुलांची वाट अलवार शोधली,
कोणी सजवले हे क्षण — देव जाणे… देवच जाणे.

(बंद ५)
लोक म्हणाले “कविता” — मात्र ती जुनी जखम आपली,
प्रत्येक ओळ उमटताना हृदयात एक रेघ उठली,
दुःखाने ढग बनून शब्दांची बरसात केली,
‘मेघ’ हळूहळू मनात शांत बरसत राहिला…
ही शांतता देणगी की शिक्षा — देव जाणे… देवच जाणे.

बुधवार वार, १८/२/२६, ९:४० PM
अजय सरदेसाई — ‘मेघ’