प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 14 March 2024

एक गांव रस्त्याच्या कडेला

एक गांव रस्त्याच्या कडेला, नुसतेच वसले आहे

कुणी पाहुणा गावांत येत नाही म्हणून रुसले आहे

एक काळ होता जेव्हा त्या गावांत लोकांची वर्दळ होती

तारुण्य पळाळे शहरात आता ,वृद्धत्व तिष्ठत पडले आहे

एक वृद्ध आज्जी तिच्या झोपडीत अंथरुणाला खिळलेली

अंग फणफणले आहे तापाने डोळ्यांतून अश्रू झरत आहे

कावळा कुणाची पाही वाट विद्युत खांबा वर बसुन हताश

एखादी एसटी येते नि जाते ,अजून कुणीच उतरले आहे

धुळीने माखलेल्या रस्त्यांना कसली आतुर ही अपेक्षा

रणरणत्या उन्हात इथे का कधी कोण फिरकले आहे

राखणदाराची जत्रा जवळ आली,वृद्ध डोळे लागले वेशिवर

ते सळसळतं तारुण्य परतेल , मनास अजून व्यर्थ आस आहे

एक गाव रस्त्याच्या कडेला धुळीत सुस्तावलेले आहे

एक कुत्रं भर रस्त्यात विनधास्त लवंडून निजले आहे

 

गुरुवार, १४/०३/२०२४ , :५१ PM

अजय सरदेसाई (मेघ)

 

No comments:

Post a Comment