कविता पंढरी माझी शब्द माझे वारकरी।
हृदय माझे शब्दां संगे पंढरीची वारी करी।।
चंद्रभागेत न्हाऊन माझे शब्द झाले अभंग।
दर्शने विठ्ठलाच्या उठले हृदयी प्रेम तरंग।।
नाम्याच्या पायरीवर अलगद टेकले पाय।
गाभाऱ्यात उभी पाहे वाट कविंची माय।।
वारकऱ्यांनी विठ्ठलाचा घोष करुन वाजवला टाळ।
स्तब्ध झाल्या जाणिवा इतर, कवितेशी जुळली नाळ।।
माऊलीस स्मरून मग ओघवली माझी लेखणी।
विठ्ठलाच्या कृपेने झाली लेखणी माझी देखणी।।
मंगळवार , १२/०३/२०२४ , ०२:१५
अजय सरदेसाई ( मेघ )
No comments:
Post a Comment