प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday, 11 February 2026

कुंचला


 


कुंचल्यातून वेदनांचे रंग भरत गेलो मी,
प्रत्येक शब्दातून अंतरीचा हुंदका उमटत गेला मी।
कागद जरी निःशब्द होते, तरी रेषाच बोलत होत्या,
मनातल्या प्रत्येक जखमेचा अर्थ वाचत गेलो मी।
ही तसबीर ओली का दिसते, कुणालाच कळले नाही,
डोळ्यांतून अलगद रंग झरत राहिलो मी।
दाद नाही, दिलासा नाही, कुणी साथ दिली नाही,
स्वतःच्या सावलीतूनच चालत राहिलो मी।
आठवणींची वादळी झुळूक जेव्हा जेव्हा आली,
स्वप्नांच्या निखार्यांना फुंकर घालत राहिलो मी।
शेवटी उमगलं, ऐ ‘मेघ’, हेच कलेचं खरं गूज —
मन जळत राहिलं… आणि त्यातच उजळत गेलो मी।


बुधवार, ११/२/२६ , १०:५२ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment