प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 19 February 2026

रंग माझा वेगळा


लोक आपला रंग बिंबवू दुसऱ्यांवर पाहतात,
नाहक दुसऱ्या रंगात आपला रंग ठसवू पाहतात।

माझा मात्र रंग वेगळा,नितळ पाण्या सारखा,
कशातही मिसळले मला, होतो मीच तया सारखा।

जरी वेगळा मी,तरी सर्वांत मी आहे,
सांग वेड्या ती वस्तू ज्यात मी न आहे?

जाशिल कुठे पळून,लपशिल तू कोठे?
ह्या ब्रह्मांडातून साऱ्या चैतन्य माझेच वाहे।

पळून पळून थकशिल,शेवटी माझ्यातच विसावशील,
तू ना ओळखत मला तरी मी तुला ओळखून आहे ।

गुरुवार, १९/२/२६ , ८:२१ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment