प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 19 February 2026

गझल - देव जाणे


शब्द की रक्त उमटलं कागदावर — कळेना, देव जाणे
कागद भिजत गेला, मनिचं गुज कळेना — देव जाणे

सावल्या रात्रभर मनाशी खेळत राहिल्या,
श्वासात तुझं नाव कोण कुजबुजलं — कळेना, देव जाणे

पापण्यांत जपलेली ती एक थरथरती ज्योत,
वाऱ्याविना अशी का लुकलुकली — कळेना, देव जाणे

दुःखाच्या मातीत स्वप्नांची बीजे फुटली,
उजाडल्या मनात फुलं कशी उमलली — कळेना, देव जाणे

वाचता माझ्याच ओळी धूसर होत गेल्या,
की अश्रूंनी अक्षरांचे अर्थ विरघळले — कळेना, देव जाणे

लोक म्हणती “कला” — मला वाटे जुनी जखम,
दुःखाने गाणे मला कसे शिकवले — कळेना, देव जाणे

‘मेघ’ स्व: पासूनही दूर होत गेला हळूच,
एकटेपणाशी नातं जुळलं कधी — कळेना, देव जाणे

बुधवार, १८/२/२६ , ८:०० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment