प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday 23 February 2024

जाणता अजाणता


 

जुळल्या आपल्या रेशीमगाठी जाणता अजाणता

वाटेत भेटलो अवचित आपण जाणता अजाणता ।।

मनःकोषात जे लपुन ठेवले तुझ्या नी सर्वांपासुनी

उघड झाले गुज ते आता जाणता अजाणता ।।

हृदयांत जे आळवित होतो तुझे प्रेम गीत

ओठांवर तो यमन आला जाणता अजाणता ।।

रोज तुला दुरून न्याहाळून दिवस सरत होते

स्वप्नमार्गे हृदयांत शिरलीस जाणता अजाणता ।। 

मधुगंध तुझा श्वासात दाटला बेधुंद झाली गात्रे  

हळुवार मनांत मोरपंख फिरला जाणता अजाणता ।।

 

शुक्रवार २३//२४ , ११:५० PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment