प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Sunday 10 March 2024

पावसाळा आला

विज कडाडली पाऊस आला।
पाला पाचोळा वाहुन गेला।।
स्वच्छ झाले क्लांत-म्लांत वन।
धुंद कुंद वारा स्मृती गंध घेऊन आला।।
पहा सुर्य किरण ढगातुन अपवर्तीत झाले।
सोनेरी आकाशांत सप्तरंगी इंद्रधनु पसरला।।
हिरवे हिरवे गार गालिचे पसरले सभोवार।
केतकी च्या बनी तिथे आनंदे मोर नाचला।।
दूर डोंगर माथ्यावरून सरसर झिरपले झरे।
धबधब्यांतुन खळखळ मेघ मल्हार कोसळला।।
गगनावरी उमटली एक गर्भित ओली सांजवेळ।
सृजनाची खूण घेऊन सर्वत्र पर्णांकुर उमलला।।
निसर्गाने अवचित  काही क्षणात बदलली कूस।
प्रेम ऋतू घेऊन प्रेमिकांनो पहा हो पावसाळा आला।।

 

रविवार , १०/०३/२०२४ , ०७:५०  PM

अजय सरदेसाई (मेघ ) 

No comments:

Post a Comment