वाटते मना एकदा तरी स्वच्छंद मी जगावे ।
वाहणाऱ्या वाऱ्या समे सर्व दिशांना फिरावे ।।
कवी झालोच कधी तर वाटते बाकीबाब व्हावे ।
विश्वमनाच्या गुढ गर्भातून काव्य मोती मी वेचावे ।।
मृदु कुसुम कळी सम त्या जिवन माझे ही फुलावे ।
जैसे सुरवंटाचे फुलपाखरु होऊन रानी वनी उडावे।।
सळसळत्या नदी किनारी थरथरती पर्णपाती।
हा देखवा पाहुनी डोळा वाटे पुन्हा प्रेम करावे ।।
आकाश पटलावर चित्रकार कोण विविध रंग भरतो।
मी ही आयुष्यात कुणाच्या ऐसे सुंदर रंग भरावे ।।
आयुष्य जरी संपले माझे तरी मी आठवांत असावे।
पारिजातकाचा गंध होऊनी श्वासांत भरुन उरावे।।
बुधवार, २८/२/२०२४ , १२:२५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment