अलवार सुगंध मोगरीचा
दरवळला माझ्या मनांत
जणु मिठीत सरुन माझ्या
तु शांत नीजली आहे ।।१।।
अधिर कटाक्ष तुझा
अंगी रोमांच दाटलेले
ती भेट चांदण्यात
मनांत जपून आहे ।।२।।
बरसतात श्रावण सरी
अंग चिंब भिजलेले
निसर्ग हा सजलेला
प्रेम गीत गात आहे ।।३।।
बंद होतां पापण्या
तुलाच पाहतो मी
पुर्ण चंद्र आसमंती
स्वरुप तुझेच आहे ।।४।।
श्वासात तुच माझ्या
तुच स्पंदनात आहे
तुच नादब्रह्म माझा
ओंकार तुच आहे।।५।।
स्पर्श तुझा होताना
फुलपाखरू मनात फुलले
जणु शुष्क धरेला
वैशाख सर आहे ।।६।।
ह्या भावना सुगंथी
पेरल्या कुणी मनांत
झंकारली तनु माझी
जणु सितार आहे ।।७।।
रविवार १८/२/२०२४ , ८:५८ AM
अजय सरदेसाई (मेघ)
No comments:
Post a Comment