प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday 1 December 2023

आनंद गाणे पुन्हा करु सुरु

जीवन आणि मृत्यू चा खेळ हा अविरत चालणारा , न संपणारा आहे .खरा खेळ तर जिवा-शिवाच्या भेटीचा आहे . जीव हा सतत शिवाच्या भेटीस उत्सुक असतो . जन्म मृत्यूच्या चक्रा मध्ये त्यांची भेट होत असते आणि ते आपले अर्धवट राहिलेले आनंद गीत गातात.
हे सर्व चक्र एक अमृतानुभव आहे . ते शिव आणि माया ह्यांचं निरंतर नृत्य आहे . जेव्हा शिव नृत्य (तांडव) करतो तेव्हा मायेचा विलय (ह्रास) शिवांत होतो आणि जेव्हा मायेचं नृत्य सुरु असतं तेव्हा शिव निद्रेंत असतो .

चले रे सख्या आपले आनंद गाणे पुन्हा करु सुरु । 
चार घडी चा वियोग संपला पुन्हा करु आपले नृत्य सुरू ॥

तुझे नी माझे गीत पुराणे आळवु चल पुन्हा नव सुरांनी । 
पुनर्भेटी चा चल रे सखया आनंद साजरा करु ॥

ज्योती तू नि मी निरांजन ,मी शिष्य तू माझा सद्गुरू ।
चौदा भुवनांत हा खेळ आपुला सतत आहे सुरु ॥

जन्म मृत्यू च्या चक्रा तून हे नाते आपले सुरु । 
जिवा-शिवा ची ही कथा पुराणी शेवटून पुन्हा सुरु ॥

चले रे सख्या आपले आनंद गाणे पुन्हा करु सुरु । 
चार घडी चा वियोग संपला पुन्हा करु आपले नृत्य सुरू ॥

शनिवार , २/१२/२३ , १०:१० AM 
अजय सरदेसाई (मेघ )

No comments:

Post a Comment