प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 6 September 2025

वनराईचे संगीत


नदी झुळझुळती, शीतल हिरवी,

तिचीच गाणी, मंद गूज करी।

पहाटे सोनसळी साज चढे,

स्वप्न-उषःकाळी वंदन घडे।

 

कुजबुजती किलबिल पक्ष्यांची,

गुणगुणती भुणभुण मधमाशांची।

उभा हरिण जिथे सावल्या खेळती,

खारी किरणांच्या वलयात खेळती।

 

शांत उडती निळी फुलपाखरे,

दवबिंदूनी हसती उमलती तरे।

उष्ण श्वास घेई दुपार सारी,

सोनकिरणांनी विणे वनराई भारी।

 

हळूच सरे संध्याछाया मंद,

पारव्यांचे उडती पंख निवांत।

कोल्हा धावतो हसत खोडकर,

रान कोंबड्यांची कडकड थरथर।

 

झिंगूर गाती संधिप्रकाशी,

रात्र कुशीत घेती वनराशी।

चाहुल ही अनोळखी कुणाची,

झुडूपा आडून सळसळ सर्पांची।

 

शैवाळं गहिरे, निजली गुपिते,

त्यांच्या मुळांस माती लिंपिते।

वारा, नदी आणि वनराई सारी,

मिळुन गुंफतीसृष्टी मनोहारी।

 

रात्री घुबडे करिती पहारा,

तारकांनी व्यापे नभसारा।

झाडांतून झरे रुपेरी किरण,

निजली धरती, अलवार स्पंदन।

 

पहाट पुन्हा सोनसळी हासे,

वन जागे, मंद वारे वासे।

दिवसा मागून रात्र धावते,

वनराई चे संगीत गुंफते।

 

गुरुवार,४/९/२५, १:३५ AM

अजय सरदेसाई -मेघ


No comments:

Post a Comment