प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Thursday, 18 September 2025

खंत

तारुण्यातली स्वप्ने विरून गेली, ही खंत।
आयुष्याची कळी गर्दीत चिरडून गेली, ही खंत।।


जपलं जे गुपित हृदयात, अंतरीच राहीलं।
मनातून ओठांवर न आलं, ही खंत।।


वाटलं होतं उमलतील पुन्हा नवी फुलं।
न उमलतांच पाकळ्या गेल्या झडून -ही खंत।।


प्रीत माझ्या मनातली, जरी गहिरी।
तुला न कळली सखे, ही खंत।।


"मेघ" अश्रूंमध्ये भिजत भिजत रात्र सरली।
माझा उदयस्त सूर्य मलूल-ही खंत।।


गुरुवार, १८/९/२५ , ०३:०१ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment