प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 24 January 2026

प्रतीक्षा



 

कितीदा सांग तुला माझी आठवण आली,

कितीदा सांग तू मज भेटण्यास आली.

कितीदा आयुष्यात धडपडलो मी,

सांग तू कधी मज सावरण्यास आली.

कदाचित आपल्या वाटा वेगळ्याच होत्या,

म्हणून तुझ्या येण्याची चाहूलही न आली.

रात्रभर तिष्ठत बसलो वाट तुझी पाहत,

झाल्या अस्त चांदण्या, पण तू न आली.

किती धरशील आस वेड्या मना रे,

न येणार ती, जरी वेळ निघण्याची आली.

गातो मी आता तुझ्या आठवणींची गाणी,

गाता गाता आयुष्याची संध्याकाळ आली.

 

शनिवार, २४/१/२६ , ०९:२५ PM

अजय सरदेसाई -मेघ


No comments:

Post a Comment