प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 17 January 2026

कुर्निसात



 

उगवत्या सूर्यास माझा कुर्निसात,
त्यास सहस्र किरणे नि बारा हात।

वाहत्या वार्यास माझा कुर्निसात,
शांत वाहतो जरी वादळ हृदयात।

सागराच्या प्रवाहास माझा कुर्निसात,
वर जरी उथळ, तरी शांत आत।

अढळ डोंगरास माझा कुर्निसात,
उंचच उंच, तरी अहंकाररहित।

मावळत्या चंद्रास माझा कुर्निसात,
शीतल उजेडात विरते रात।

दूरवरी तार्‍यांस माझा कुर्निसात,
अंधारातही दाखवती वाट।

दशदिशांस माझा कुर्निसात,
नित्य नवे आणती दूरची वृत्त।

 

शुक्रवार, १६/१/२६ , ११:११ PM

अजय सरदेसाई -मेघ


No comments:

Post a Comment