प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 29 July 2024

“बेला वीटा” (Happy Life),पुन्हा भेटू,


 

या पृथ्वीवर,आपण एकत्र येतो,

मनं गुंफून एकमेकांत मिसळतो.

आपण विभक्त होतो, पुन्हा भेटण्यासाठी,

जीवनाचा नवा अध्याय उलगडण्यासाठी.

 

आप्त, मित्र मंडळी, आणि अनोळखी ,

अदृश्य गाठीने बांधलेले आपल्याशी.

नियतीच्या धाग्यांनी नात्यांत गुंफलेले,

नाते इथले नी त्या पलीकडले, विणलेले.

 

शरीरं  विलीन होतात, नष्ट होतात पंचत्वात,

ती विघटित होतात त्यांच्या मूलतत्वात.

पण नव्या आकारात पुन्हा जन्म घेतात,

जन्म-मरणाच्या चक्रातून नवी ओळख बनवतात.

 

आत्मा तोच वाहतो अनेक जन्मांतून नी शरीरांतून,

तीच जुनी हकीकत उलघडते नव्या आकारांतून.

तोच एक धागा या अनंताच्या विस्तारात,

जो जोडतो जीवाला नव्या प्रारंभात.

 

आई बाबा मी तुम्हाला नेहमी आठवतो,

परा-जीवन आनंदाचे मी तुमच्यासाठी प्रार्थितो.

पुढच्या जन्मात आपण पुन्हा भेटू,

आनंद आणि मनःशांती तोपर्यंत टिकवू.

 

तोपर्यंतबेला वीटा” (Happy Life),पुन्हा भेटू,

पुढच्या जीवनात, अनंत आनंद प्रकाशात,

पुन्हा हसत-खेळत आणि आनंदात राहू,

पुन्हा एक नवे गीत आयुष्याचे नव्याने गाऊ.

 

सोमवार , २९/०७/२०२४    ०८:५५ PM

अजय सरदेसाई (मेघ)


आज बाबा असते तर ८७ वर्षांचे असते , आज बाबांचा ८७ वा वाढदिवस , ही कविता त्यांच्या आणि माझ्या आईच्या आठवणीला समर्पित

No comments:

Post a Comment