प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday 31 July 2024

निग्रह - एका लघु कथा


वैदेहीच मन आज दिवसभर विचलित होतं. हृदयात धडधडत होतं. लहानपणा पासून ते आत्ता पर्यंतच,गेल्या २९ वर्षांचं आयुष्य तिच्या डोळ्या सोमोरून तरळून गेलं. ती दहावी पास झाली तो क्षण. तिला ९७.७८ % पडले होते. ती शाळेतून पहिली आली होती. शिक्षक, आई-वडील, नातेवाईक मंडळी आणि इतर , सगळ्यांचाच समज असा होता की ती विज्ञान घेणार बहुदा पुढे शल्यविशारद किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अभियंता वगैरे होईलच , पण तसे काहीही करता ती  मास मीडिया आणि मास कॉम्युनिकेशन ची पदवीधर झाली  होती.

 

तिचे लहानपणा पासूनच जग पाहण्याचं आणि फिरण्याचे स्वप्न होते .पुढे जर्नालिसम चा कोर्स ही तिने केला होता एका छोट्या मीडिया हाऊज मध्ये काम करता करता , गेली पाच सहा वर्ष तिने खूप मेहनत घेऊन काम केले होते. हाताशी थोडे पैसे ही जमवले होते. सहा महिन्यां पूर्वी तिला गेरिट रिएटवेल्ड अकादमी, ॲमस्टरडॅम कडून तिचं फोटो जर्नालिसम च्या कोर्स साठीच अँप्लिकेशन मंजूर झाल्याचा मेल आला होता. किती आनंद झाला होता तिला तेव्हा. तिने घरीच काय पण बाहेरही कोणाकडे ह्याची वाच्यता केली नव्हती .

 

तिला माहित होते की तिचे आई वडील तिला कोणत्याही कारणास्तव जाऊ देणार नाहीत. गेल्या वर्षांपासून ते तिच्यासाठी लग्नाची स्थळं पाहत होते आणि तिने आता लग्न आणखी पुढे लांबवू नये असे त्यांचे ठाम म्हणणे होते .पण वैदेहीला लग्न म्हणजे तिच्या पायातली बेडी  वाटत होती. तिला जग फिरायचे होते , अनुभवायचे होते . तिचा निश्चय धृढ होता.हे सगळं चित्र तिच्या डोळ्यां समोरून एका चित्रपटा प्रमाणे तरळत होते.

 

सगळी आवरा आवरी काल रात्रीच करुन झाली होती.सगळं कसं बॅगेत परफेक्ट पॅक करुन ठेवल होतं. सकाळी सगळे झोपले असताना हळुच बाहेर पडण्याचा तिचा विचार होता, कदाचित परत कधीच येण्यासाठी. आई,बाबा,अथर्व आणि बेबी हेच तिचे जग होते . "त्यांना सोडून राहु शकेन?”, असा विचार एकदा तिच्या मनाला चाटून गेला. आठवण तर येणारच होती,हृदय पिळवटून निघत होतं,पण एकदा ठरवलं की मग माघार नाही!

जग पसरलेल्या अथांग सागरा सारखं तिला बोलावत होतं,खुणावत होतं आणि ती निघाली होती त्या जगाला भेटायला,पहायला, एकटीच. सोबत होती ती फक्त तिची उत्सुकता आणि धृढ निश्चय ! तिने अंधारातच आई वडिलांना नमस्कार केला . अथर्व आणि बेबी  झोपलेत ते एकदा पाहून घेतलं . ती वळून हॉल मद्ये आली , पासपोर्ट , व्हिसा , कॅश , डॉक्युमेंट्स वगैरे सर्व बरोबर आहे ह्याची खात्री करून घेतली आणि दरवाजा उघडून घरा बाहेर पडली .ती जणू स्वप्नांतील गोष्टीला एकट्याने सत्यात आणायला निघाली होती. तिच्या मनाच्या गडद आकाशात आईची  ममता आणि बाबांच्या आशीर्वादाची आठवण यांचा सुर अचानक वाजला. ती थबकली , डोळे मिटून तिने एकदा पुन्हा त्यांच्या चेहऱ्यांचे स्मरण केले आणि मनाशी ठरवले की, आता मागे वळणे नाही. तिने निग्रहाने पाऊल पुढे टाकण्यास उचलले.

 

बुधवार , ३१/०७/२०२४   , ०९:१५ PM

अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment