तू दृष्टीस पडू नये म्हणून मी वळलो;
भेट आपली होऊ नये म्हणून मी वळलो.
भेट आपली होऊ नये म्हणून मी वळलो.
सुंदर आठवणी मैत्रीच्या, जागृत अजून,
त्या कटू होऊ नयेत म्हणून मी वळलो.
डोळ्यांत टचकन दाटले अश्रू अनवट,
तू ते पाहू नयेत कधीच म्हणून मी वळलो.
मैत्री आपली चिंच-बोरांएवढी जुनी,
सुकली ती झाडे आता, म्हणून मी वळलो.
बिगरी, शाळा, कॉलेज केव्हाच मागे सुटले,
तरी हाक तुझी कानांत घुमते, म्हणून मी वळलो.
डोळ्यांत तुझ्या आज दिसले प्रश्न अनेक,
ते आज मी सोडवू तरी कसे, म्हणून मी वळलो.
शब्द ओठांवर होते तुझ्यासाठी खूप जपलेले,
ते व्यर्थ आता वाहू नयेत म्हणून मी वळलो.
मेघ म्हणतो, पाऊस साचला डोळ्यांत किती,
त्या पुरात आपण वाहून जाऊ नये, मित्रा—म्हणून मी वळलो.
मंगळवार, २२/९/२०२६, १:२५ PM
अजय सरदेसाई — मेघ

No comments:
Post a Comment