प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Monday, 8 June 2026

अगं प्रेम असं कधी लपतंय गं?



अगं प्रेम असं कधी लपतंय गं?
अगं तुझ्या डोळ्यांत सगळं दिसतंय गं,
त्या नजरेत स्वप्न तरंगतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?

अगं एकटीच का तू गुणगुणतेस गं,
श्वासांच्या भाषेत काही सांगतेस गं,
गालांवर उमललेलं फूल बोलतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?

अगं लपून तू कटाक्ष टाकतेस गं,
भेटीच्या क्षणी का बावरतेस गं,
डोळ्यांतलं हसू उघडं पाडतंय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?

चांदण्यांनाही आपली चाहूल लागलीय गं,
वाऱ्याने तुझी गोष्ट गुणगुणलीय गं,
साऱ्या आभाळाला खबर झालीय गं,
अगं प्रेम असं कधी लपतंय गं?


८ जून २०२६ । ७:४१ PM
अजय सरदेसाई 'मेघ'

No comments:

Post a Comment