प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday 17 January 2024

गाणे


आयुष्याच्या या वळणावर मी तुझेच गाणे गातो ।
मी रडत नाही मी झुरत नाही मी प्रेम गाणे गातो।।

जन्मा पासुन आजवरी तुच मला शिकविले ।
तुझ्या च या शिक्षेचे मी आज पोवाडे गातो।।

तु दाखविली सुंदर स्वप्ने अन् मी ती रंगवली।
स्वप्नांच्या त्या हिंदोळ्यावर मी आनंद तराणे गातो।।

सुरवंटांची होताना फुलपाखरें मी रोज पहातो।
सुरवंटांसाठीच त्या बागेत मी किलबिल गाणी गातो।।

शुद्ध निसर्ग तुच निर्मीला,जीव त्यात मस्त रमतो।
मेघ गर्जती श्रावणात पहा ना, मी सरींचे गाणे गातो।।

व्योमरापवायूरतेज अन पृथ्वी चे हे शरीर माझे।
पंचभुते वसली स्पंदनात जी ,मी त्यांचे गाणे गातो।।
 
गुरुवार, १८/१/२०२४ , १२:४८ PM
अजय सरदेसाई (मेघ)

No comments:

Post a Comment