पुळणीवर चालताना, आकाशातील नक्षत्रे पाहू,
तुझे नी माझे जुळणारे, नक्षत्र मिळते का पाहू।
तुझे नी माझे जुळणारे, नक्षत्र मिळते का पाहू।
लाटांच्या स्पर्शाने पाउले भिजली दोघांची,
ओल्या वाळूत ती एकमेकांत मिसळून पाहू।
तुझ्या केसांत अडकला खट्याळ वारा खारा,
त्या वाऱ्याच्या तालावर जरा धुंद होऊन पाहू।
पुळणीवर चालताना, आकाशातील नक्षत्रे पाहू,
तुझे नी माझे जुळणारे, नक्षत्र मिळते का पाहू।
बोलायचे आहे तुझ्याशी, पण शब्दच अपुरे,
नजरेच्याच भाषेत सारे, आपण बोलून पाहू।
रात्र सरावी न इतक्यात, थांबावा हा क्षण आता,
खांद्यावर टेकून अशीच जरा, तू विसाव पाहू।
पुळणीवर चालताना, आकाशातील नक्षत्रे पाहू,
तुझे नी माझे जुळणारे, नक्षत्र मिळते का पाहू।
या नक्षत्रांच्याही पल्याड, एक आकाश शोधू,
एकमेकांचं ते आकाश, आपणच होऊन पाहू।
बुधवार, १५/७/२६ , १०:३० AM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:
Post a Comment