प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Tuesday, 5 August 2025

फक्त साक्षीभाव उरला


शब्दांच्या भावविश्वात मी सजग फिरून आलो,

सापडले अनेक मोती, कवितेत विखरून आलो.

 

प्रत्येक ओळ माझी,स्फुरतीने तुझ्या फुलते,

तुझ्या धुंद आठवांनी,माझी कविता खुलते.

 

हे स्वप्न असे की हे सत्य,शोधणे सोडून आलो,

विमुक्त या क्षणांत,मी आयुष्य जगून झालो.

 

हा थंड मंद वारा, तुझा गंध घेऊन आला,

कवितेतून माझ्या, मी तुला स्पर्श केला.

 

दोन्ही विश्वातून त्या, मी सहज प्रवास करतो,

सत्य नि मिथ्य जोडणारा,मी एक दुवा ठरतो

 

प्रवाह आयुष्याचा, क्षणातून काळात फिरला,

उरलो न मी देहात — फक्त साक्षीभाव उरला.

 

सोमवार, ४/८/२५, १०:५५ PM

अजय सरदेसाई -मेघ


No comments:

Post a Comment