संध्याकाळी बाल्कनीत बसलो होतो.सूर्य नुकताच अस्त होत होता ,छान गार वारा सुटला होता. वातावरण अगदी मस्त होतं , का कोणास ठाउक गरम गरम बटाटे वडे खायची इच्छा उफाळून आली .गायत्री (माझी बायको) ला विचारल की गरम गरम बटाटे वडे खाणार का म्हणून ?
नाक्यावर मंगेश वडे वाल्याकडे अगदी गरमागरम आणि टेस्टी ताजे बटाटे वडे मिळतात संध्याकाळी या वेळेला. गायत्रीला सुद्धा बटाटे वडा आवडतो, ती हो म्हणाली . मी कपडे चढवले आणि खाली उतरलो .
खरं तर काही कारण नाही पण सहज विचार आला , आई मला बटाटे वडा खणायची इच्छा झाली आहे हे समजल्यावर लगेच तयारी ला ही लागली असती आणि अर्ध्या तासाच्या आत गरमागरम बटाटे वडे आणि चहा समोर असता ! आईची माया तिची , मुलाला खायची इच्छा झाली आणि त्या अन्नपुर्णेने ती पूर्ण केली नाही असे कधीच झाले नाही . बटाटे वडे घेऊन घरी आलो , गायत्रीने चहा करायलाच टाकला होता. दोघांनीही मिळून अगदी आनंदात वड्यांवर ताव मारला आणि चहा ढोसला . मन अगदी तृप्त झालं.
रात्री
झोपताना मी गायत्रीला माझी आवडती गोधडी काढायला सांगितली .आईने माझ्यासाठी प्रेमाने तिच्या जुन्या साड्यां पासून बनवलेली गोधडी .तलम तरीही आश्चर्यकारक पणे उबदार. आईच्या कुशीत शिरल्याची जाणिव करुन देणारी ती गोधडी.जादुची गोधडी.आज पुन्हा अंगावर घ्यावीशी वाटली ती गोधडी.
पूर्वी
लहान असताना अशीच आईची उबदार गोधडी घेऊन मी बाबां जवळ झोपायचो .रात्री झोपतांना बाबांनी गोष्ट सांगायची आणि आईच्या त्या उबदार गोधडीत गोष्ट ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचच नाहीं.
आज कितीतरी वर्षांनी झोपतांना आईची गोधडी पांघरून घ्यावीशी वाटली ,तलम आणि उबदार अशी .आईच्या कुशीत शिरल्या सारखे वाटले एकदम .सर्व भिती ,काळजी ,त्रास कुठच्या कुठे पळून गेला. सगळं हलकं हलकं वाटायला लागलं , मनांत आनंद दाटून आला. आई प्रेमाने माझ्या केसांना तेल लावत आहे असे वाटत होते . आईच्या तोंडून तिच्या आवडत्या गाण्याची लकेर आली .......
काळजी जगाची साऱ्या आहे भगवंता
अंगावरी पांघरूण घेऊनिया काळे ,
देवाजीच्या मांडीवर ब्रह्मांड झोपले .
लाख चांदण्यांचे डोळे उघडे ठेवून ,
पिता तो जगाचा आहे जागत अजुनी
प्रेमाची उब भासत होती .मला गुंगी लागली. झोपेने कधी ग्रासले ते कळलेच नाही .
शुक्रवार ३०/०८/२०२४ ०८:२६ PM
अजय सरदेसाई (मेघ)