प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 7 February 2026

ए वॉक डाऊन द मेमरी लेन


बर्‍याच वर्षांनंतर त्या दिवशी कसं कोण जाणे,माझी पावलं आपोआप कॉलेजकडे वळली.

गेट तेच होतं.

भिंती त्या-त्याच.

फक्त रंग थोडे फिके पडले होते.

कॉरिडॉरमधून चालताना माझ्या चपलांचा आवाज जरा जास्तच स्पष्ट ऐकू येत होता,

जणू शांततेने प्रत्येक चाहूल मोठी करून टाकली होती.

मी माझ्या जुन्या वर्गाच्या दरवाज्यापाशी येऊन थांबलो.

काही क्षण तसाच उभा राहिलो.हात पुढे करून दरवाजा ढकलला.तो हलक्या चरचर आवाजासह उघडला—

आत एक रिकामी खोली जणू माझीच वाट पाहत होती.

बेंचेस नीट लावलेल्या.

फळ्यावर खडूची धूळ साचलेली.

खिडकीतून येणारं ऊन शांतपणे जमिनीवर पसरलेले.

सगळं स्थिर… शांत…

जणू इथे कित्येक वर्षांत कुणी आवाजच केला नव्हता.

पण गंमत अशी की—

माझ्या आत मात्र गजबज होती.

तोच जुना गोंगाट.

मित्रांची हसणं, कुजबुज, नोट्स मागण्याचे आवाज,

पानांची सळसळ…

सगळं पुन्हा जिवंत झाल्यासारखं.

मी हळूच आत आलो आणि शेवटच्या बाकावर जाऊन बसलो.

आणि त्या गोंगाटातून

तू दिसू लागलीस.

जसं उन्हात एखादा जुना फोटो अचानक उजळून निघतो,

तसं तू अगदी स्पष्ट दिसायला लागलीस.

तुझं हसणं, मान खाली घालून बोलणं,

केस कानामागे सारण्याची तुझी सवय…तुझी लक्ष...

सगळं तसंच.

छताच्या पंख्याच्या वाऱ्यात

तुझ्या परफ्यूम चा ओळखीचा सुगंधही दरवळला.

क्षणभर वाटलं—

वेळ कुठेतरी थांबून तुझी उपस्थिती जपून बसला आहे.

आठवणींनी जणू कुस बदलली.

तू माझ्या समोरच्या बाकावर बसली होतीस.

काहीतरी बोलत होतीस.

मी ऐकत होतो. हसत होतो.

संपूर्ण वर्ग पुन्हा भरून गेला होता— फक्त आपल्या दोघांसाठी.

हळूहळू बाकी सगळं धूसर होऊ लागलं.

भिंती… खिडक्या… दरवाजा…

सगळं विरघळून गेलं.

फक्त तू होतीस.

आणि मी.

दोन स्पंदनां मधला एक छोटस निमीष.

अचानक पंख्याचा आवाज मोठा झाला.

मी पापणी लवली.

सगळं नाहीसं झालं.

न तू…

न हसणं…

न गोंधळ…

फक्त रिकामे बाक, ऊन आणि शांतता.

मी एकटाच बसलो होतो—

एका जुन्या वर्गात, जुन्या आठवणींसोबत.

तेव्हाच उमगलं…

काही जागा कधीच रिकाम्या नसतात,

उशिरा आपणच परत येतो.

आणि सत्य असंच होतं—

तिथे कुणीच नव्हतं.

फक्त मी… आणि माझ्या आठवणी.हीच खरी हकीकत.

मी काही वेळ तसाच बसून राहिलो.

त्या आठवणींच्या ऊबेत हात शेकत…

जणू थंड सकाळी उन्हाचा छोटासा कवडसा सापडावा.

हळूहळू वेळ परत यायला लागला.

पंख्याचा आवाज, खिडकीतून येणारा वारा, बाहेरची पावलं—

सगळं पुन्हा खरं वाटू लागलं.

मी उठलो.

बेंचकडे एक शेवटची नजर टाकली,

फळ्याकडे पाहिलं,

आणि दरवाज्याकडे चालू लागलो—

जणू इथे कधी काही घडलंच नव्हतं.

बाहेर येऊन दरवाजा अलगद बंद केला.

तोच चरचर आवाज पुन्हा घुमला—

यावेळी जरा अधिक रिकामा.

मी वळलो आणि निघालो.

पण सोबत काहीतरी होतंच…

एक हलकीशी जाणीव—

की काही भावना कधीच विलोपत नाहीत,

त्या फक्त बंद दरवाज्यांमागे

शांतपणे श्वास घेत राहतात.

कॉरिडॉरमध्ये पावलं आपोआप मंदावली.

आणि कसं कोण जाणे,

ओठांवर एक जुनी गझल तरळली.

मी हळूच गुणगुणू लागलो—


दशकं उलटली, तुझी आठवणही आली नाही,

पण मी तुला विसरलो,असही झालं नाही.

विसरण्याचं धाडस च कधी झालं नाही,

दूर राहूनही तू कधी दूर गेलीस नाही…


आणि तेव्हाच समजलं—

काही नाती सोबत चालत नाहीत,ती आठवण बनून आयुष्यभर सोबत चालत राहतात.


शनिवार, ७/२/२६, ०३:४५ PM
अजय सरदेसाई – मेघ

No comments:

Post a Comment