प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday 10 January 2015

माणूस -१


माणसांच्या जातीत माणसे आहेत थोडीच , उरलेली सर्व आहेत न उलघडणारी कोडीच
माणसाने कसं माणसासारखं वागावं , चोऱ्या मर्या कराव्यात आणि दुसऱ्याला नागवावं 
माणसांच्या वस्तीत माणूसच नसतो , चुकून जर भेटलाच तर आपणच टाळत असतो
माणसाला नेहमीच अनंताची गोडी , मिळवण्यासारखं अनंत असतं पण वेळ असते थोडीच 
एकटा असताना माणूस केविलवाणा दिसतो , माणसांच्या गर्दीत तो माणूसघाणा होतो 
माणसाचं माणसाशी नातं तसं एकच असतं , एकमेकां वाचून त्यांचे काहीच चालत नसतं
माणसाचं स्वतःचे असे एक तत्वज्ञान असतं ,बोलायचे एक आणि करायचं दुसरंच असतं 
माणूस तसा खूप विचारी असतो , अविचार करताना ही तो विचार करतोच 
माणूस हा खूप समाधानी आहे ! दुसऱ्या कडे काय नाही ,यातच त्याचं समाधान आहे 
माणूस तसा कश्यात ही रमतो ,स्वतःची कीव करत करत आयुष्य जगतो 
माणसाची जात तशी खूप भित्री असते ,स्वतःतल्या दोषांची त्यांना पुरेपूर खात्री असते 
माणसाला नेहमी विध्वंसाची ओढ असते ,जुळवलेल्या गोष्टी मोडण्याची खोड असते 
स्वतःची प्रतिमा उजळण्यास माणूस काहीही करू शकतो ,आरशातल्या प्रतिमेवर त्याचा अजिबात विश्वास नसतो 
कधी कधी मात्र माणूस अगदी वेड्यासारखा वागतो ,सोडून स्वार्थ स्वतःचा दुसऱ्या साठी धावतो 
मी ही एक माणूसच आहे आणि माणसासारखंच वागतो,वर दिलेल्या माणसांच्या खुबी मी ही पाळतो  

शनिवार , दिनांक : ०१/०४/१९९५ , ११:३० 
अजय सरदेसाई (मेघ ) 

No comments:

Post a Comment