प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Saturday, 24 February 2024

कशी वर्णु मी ती रात्र ?


 

तोकड्या शब्दांनी माझ्या कशी वर्णु मी ती रात्र ।
दोन तनुंच्या अंगारात धगधगती ती मखमली रात्र ।।१।।
 
गात्रांतून ओथंबून वाहते एक बेभान रणरणती ओढ ।
विसरु म्हणता विसरत नाही ती स्फुलिंगणारी रात्र ।।२।।
 
चमचमणाऱ्या ताऱ्यां खाली तळमळणारी आस ।
तिमीरी पांघरुणाखाली लखलखती शृंगारिक रात्र ।।३।।
 
दोन जीवांच्या मिलनाचा उफान भोगविलास ।
प्रेमपुर्तीच्या तृप्त गात्रांनी थकुन झोपली रात्र ।।४।।
 
शनिवार २४/२/२०२४ , ८:५७ PM
अजय सरदेसाई (मेघ)