प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday, 23 October 2026

मी गीत, तू तराणा...




मी गीत,
तू तराणा हो ना.
मी गोष्ट,
तू ती सांगना.
अपूर्ण होते मी रे,
तू सुचलास,
आणि मी पूर्ण झाले ना…


कुणीच नव्हतं ऐकणारं,
तेव्हा तू ऐकलंस मला.
शब्द नव्हते ओठांवर,
तरी डोळ्यांत वाचलंस मला.
कितीदा रडले लपून मी,
कुणालाच कळलं नाही.
तू फक्त हात धरलास,
आणि दुःखच उरलं नाही.


कधी कधी एक भीती वाटते,
सुख इतकं मिळालंय म्हणून.
भीती वाटते, कुणी तुला हिरावेल म्हणून,
तू नसलास तर, तुझ्या विना मी मरेन?
तू म्हणतोस, "वेडी आहेस",
मी हसते, डोळे भरतात.
का रे, हरवायला घाबरतात?


मी गीत,
तू तराणा हो ना.
मी गोष्ट,
तू ती सांगना.
अपूर्ण होते मी रे,
तू सुचलास,
आणि मी पूर्ण झाले ना…


उद्या कदाचित मी नसेन,
माझं गाणं तू गुणगुणशील?
एका ओळीवर थांबून,
हळूच डोळे पुसशील?
तेव्हा फक्त एवढं कर,
मुखडा पुन्हा म्हण रे.
मी तिथेच असेन जवळ,
डोळे मिटून ऐक रे.


काय सांगू तुला आता,
शब्द सारे मूकच होतात.
तुझ्या माझ्या प्रेमकथेत
फक्त डोळेच बोलू लागतात.
मी तुझ्या नि तू माझ्या डोळ्यात पाहा,
तू कुठेही जा रे, पण माझ्या डोळ्यात रहा.


मी गीत,
तू तराणा हो ना.
मी गोष्ट,
तू ती सांगना.
अपूर्ण होते मी रे,
तू सुचलास,
आणि मी पूर्ण झाले ना…

शुक्रवार, २३/१०/२०२६ , ७:०० PM
अजय सरदेसाई -मेघ 

No comments:

Post a Comment