प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday, 23 February 2024

जाणता अजाणता


 

जुळल्या आपल्या रेशीमगाठी जाणता अजाणता ।

वाटेत भेटलो अवचित आपण जाणता अजाणता ।।

मनःकोषात जे लपुन ठेवले तुझ्या नी सर्वांपासुनी ।

उघड झाले गुज ते आता जाणता अजाणता ।।

हृदयांत जे आळवित होतो तुझे प्रेम गीत ।

ओठांवर तो यमन आला जाणता अजाणता ।।

रोज तुला दुरून न्याहाळून दिवस सरत होते ।

स्वप्नमार्गे हृदयांत शिरलीस जाणता अजाणता ।। 

मधुगंध तुझा श्वासात दाटला बेधुंद झाली गात्रे । 

हळुवार मनांत मोरपंख फिरला जाणता अजाणता ।।

 

शुक्रवार २३/२/२४ , ११:५० PM

अजय सरदेसाई (मेघ)