प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Friday, 4 September 2026

वेगळी वाट



वाळूचे कण, करोडों, तरी वेगळे,
काळाचे क्षण, अब्जों, तरी वेगळे।
एकाच सागरातील लाटा साऱ्या,
तरी किनारी उमटती ठसे वेगळे॥

आभाळातील तारे, अगणित जरी,
ओळख त्यांची आभाळापल्याड नाही।
फुलबागेत रंग हजारो फुलांचे,
बागेतच त्या हजारो फुलांची राई॥

माणसेही अशीच, गर्दीत असंख्य,
प्रत्येकाच्या मनात कहाणी वेगळी।
माणसं तीच जरी, माणुसकी वेगळी,
माणसामाणसांतील दुनिया वेगळी॥

क्षणाक्षणांनी सरत जातो हा काळ,
तरी आठवणींची प्रत्येक सावली वेगळी।
जीवन एकच जरी, धरा एकच सारी,
तरी प्रत्येकाची जगण्याची वाट वेगळी॥

शुक्रवार, ४/९/२६, ५:४५ PM
अजय सरदेसाई — मेघ