प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....
Showing posts with label marathi Abhanga. Show all posts
Showing posts with label marathi Abhanga. Show all posts

Sunday, 6 July 2025

पांडुरंग रुप माधुरी

नयनमनोहर रूप तुझे, पांडुरंगा पावन थोर । 
विटेवरी तू उभा रहावा, आम्हांस समचरणांचा धीराधार ॥१॥
 
डाव्या पदावर चिन्ह शुभ, भक्तप्रेमाचं त्यात तेज । 
मांड्यांमधे गुराख्याची काठी, गोपाळ लीला अद्भुत सहज ॥२॥
 
कटी पितांबर कसुन भर्जरी,सुवर्ण मेखला सजली त्यावरी 
शुभ्र कमळ दक्षीण करी , पांचजन्य स्थिर वाम करी ॥३॥
 
नाभीअसे ब्रह्मज्योती,ब्रम्हांडाचे तेचि बीज  । 
वक्षस्थळी रुक्मिणी विराजित , जाणे मनाचे गुज  ॥४॥
 
गळ्यात तुळशीमाळ दाटे, कौस्तुभमणी दीपे तेज । 
गूढ स्मित मुखकमलावर, डोळ्यांत कृपेचा साज ॥५॥
 
मकर कुंडले कानात ती, शोभे दैवी अलंकार । 
भाळी तिळक कस्तुरीचे, लेवीसी भक्तचरणांचा अबीर त्यावर  ॥६॥
 
माथ्या वरती शिवपिंडी, त्यावर तेजोमय मुकुट । 
शिव विष्णूचा जेथे संगम,तो पांडुरंग तूं साक्षात  ॥७॥
 
पायापासून शिरोबिंदू, तुझं दर्शन गुढ अपार । 
मेघ म्हणे विठूमाऊली , तूच आमुचा संसार! ॥८॥
 
रविवार , ६/७/२०२५ (आषाडी एकादशी ), ०२:१० PM
अजय सरदेसाई (मेघ)