प्रस्तावना

मला कविता करावीशी वाटते , पण जी कविता मला अभिप्रेत आहे , ती कधीच कागदावर अवतरली नाही . ती मनातच उरते , जन्माच्या प्रतीक्षेत ! कारण कधी शब्दच उणे पडतात तर कधी प्रतिभा उणी पडते .म्हणून हा कवितेचा प्रयास सतत करत असतो ...........
तिला जन्म देण्यासाठी , रूप देण्यासाठी ,शरीर देण्यासाठी ......
तिला कल्पनेतून बाहेर पडायचे आहे म्हणून
....

Wednesday, 31 December 2025

काळाचा प्रवाह


 

काळाच्या प्रवाहात वाहत राहिला माझा काळ,

ओंजळीत साठवू पाहिला, निसटून गेला माझा काळ।

 

काठावर उभा राहून मी वाटच पाहत राहिलो,

काळाच्या प्रवाहात हरवला; परत न आला माझा काळ।

 

आयुष्य पुढे सरकत राहिले काळाच्या अखंड प्रवाहात,

गुळगुळीत दगड बनला मागे पडलेला माझा काळ।

 

हृदयाच्या वहीत शाईत उतरलेले शब्द होते,

जुन्या पानांत अलगद विसावून राहिला माझा काळ।

 

आयुष्याच्या पुस्तकात काही वाळलेली फुले सापडली,

त्यांच्या वाळीक सुगंधात भरून राहिला माझा काळ।

 

आज पुन्हा एक नवे वर्ष आले,जुने नकळत निसटून गेले.

सत्तावन वर्षांच्या जीवनाची ‘मेघ’ ,मोतीमाळ झाला माझा काळ।

 

गुरुवार, १/१/२६ १०:५४ AM

अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment