Sunday, 22 March 2026

माझी कविता


 

श्वासाश्वासात एक कविता जगते माझ्या,
हृदयात ती कविता स्पंदते माझ्या…१

साधेच रूप तिचे, ती नव्हे लावण्यवती,
नीटनेटकी उतरते तरी ती शब्दांत माझ्या…२

नाही रंग तिला, ना आकार स्वतःचा,
भावनांचा अलंकार ती नेसून येते माझ्या…३

मौनातल्या गाभाऱ्यात ती अलवार उमलते,
परा–पश्यंती–मध्यमा, शेवटी वैखरी असा प्रवास करते…४

लेखणीतून ती शब्दांत उतरते तेव्हाच उमगते,
एरव्ही पराच्या सूक्ष्म जगात विहरते…५

निर्माता दिसलो जरी मी, निर्माण नाही करत,
ती स्वयंभू नि स्वयंप्रकाशी—आहे उपजत…६

कवी म्हणून मी फक्त नावास आहे,
कधी, कुठे, का नि कसे व्यक्त व्हावे—यास ती स्वयंसिद्ध आहे…७

शब्दांच्या पलीकडे तिचा खरा वास आहे,
श्वासातल्या शांततेतच तिचा निवास आहे…८

रविवार, २२/३/२६ , १:५४ PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment