Wednesday, 13 August 2025

झेपावले डोळ्यांवर, उजेडाचे ससाणे.


 

कितीदा केल्या विनवण्या,

कितीदा मी केले बहाणे,

कितीदा स्मरून तुला,

मी गायलो तुझेच गाणे.

 

तु न आलिस तेव्हा,

न आहेस तु आता ही,

तरी गुणगुणतो मी,

अजून तुझेच गाणे.

 

भाव जो माझ्या मनांत,

भाव तोच तुझ्या मनांत,

भाव एक, तरीही ,

का हे आपले विरहणे

 

उभी तु क्षितीजास रेलून,

दिसतेस,परी आहेस दूर इथून,

टळले आयुष्यात आता,

तुझे नी माझे भेटणे.

 

निजली चांदण्यांची रात्र,

नुरली ती स्वप्नांची रात्र,

झेपावले डोळ्यांवर,

उजेडाचे ससाणे.

 

बुधवार १३/८/२५ , ७:२७ PM

अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment