Thursday 14 March 2024

पाऊस


 

आज पन्नाशी ओलांडली आहे माझ्या वयाने.तरी ही माझ्या साठी पहिला पाऊस म्हणला की शाळेच्या दिवसांचीच आठवण घेऊन येतो. आता विचाराल, का ? तर  ते माहीत नाही.माझ्या मित्रांना आणि मला वाटतं झाडून सर्व कविंना "ती" ची आठवण येते."ती" म्हणजे तुम्हाला कळलंच असेल , असलेली (खरी) किंव्हा जास्त करुन फक्त मनात असलेली (खोटी) प्रेयसी. का ? तर ते ही मला माहीत नाही.मला मात्र शाळेचे पावसाळी दिवस आठवतात.

 

नविन पुस्तकांचा गंध, पुस्तकांना घातलेल्या कव्हरांचा गंध.शाळेतून येताना रस्त्यांवरुन वाहणारे ओहळ . पाण्याने भरलेली डबकी, येणाजाणाऱ्या वाहनांनी अंगावर उडणारे गढुळ पाणी चुकवण्यासाठी झालेली लोकांची कसरत , उडालेली तारांबळ आणि तेव्हाच आपल्याला अंगावर हे पाणी उडावं अशी एक सुप्त ईच्छा.

 

हे सगळं डोळ्यां समोर साकारत असतं.छोट्या छोट्या डबक्यांचे झालेले छोटे तलाव आणि त्यात पोहणारे विविध रंगांचे चिमुकले मासे.अचानक सदृश्य झालेल्या गोगलगायी, बेडकं आणि गांडूळं जाणे कुठुन कसे येतात कोणत्या गावात राहतात . पावसाच्या आधी हे कोणाच्या गावाला ही नसतं.एक वेगळच जग असतं ते! तरी ही आपल्याच जगाचा भाग असलेलं. त्या जगांत चाललेला असतो एक वेगळाच कोलाहल. ह्या जगा पासुन अलिप्त पण तरीही सदृश्य.

 

बॅकग्राऊंड ला सतत पिरपिरणाऱ्या पाऊसाचं आणि वाहणाऱ्या पाण्याचं म्युझिक. हे सगळं चाललं असताना अवचित लागलेली तंद्री तोडणारा तो भाजलेल्या कणसांचा जळकत वास नाकांत जातो आणि आपण भानावर  येतो. नाही म्हंटले तरी तोंडात ल्हाळ येतेच पण त्याच बरोबर खिशात पैसे नसल्याची जाणीव ही तग धरते आणि आपण आणखी जोमाने घराच्या दिशेने चालू लागतो, कारण खुप भुक लागलेली असते आणि गरमागरम वरणभाताचा स्मृती गंध खुणावत असतो.

 

आता असं हे विविध रंगी विविध ढंगी नव चैतन्य लाभलेलं जग आठवावं का (कोण कोणाची "ती" वास्तविक का  अलास्तवीक ) "ती" आठवावी ते तुम्हीच सांगा!

 

बुधवार , १३/०३/२०२४ मी ०५:१५ PM

अजय सरदेसाई (मेघ )

No comments:

Post a Comment